धारावीतील सिलिंडर स्फोटात 17 जखमी; पाच जणांची प्रकृती चिंताजनक, दुर्घटनेचे कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:20 AM2021-08-30T07:20:58+5:302021-08-30T07:21:04+5:30
दुर्घटनेचे कारण अस्पष्ट
मुंबई : धारावी, शाहूनगर येथील मुबारक हॉटेलसमोरील रस्त्यावर रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गॅस सिलिंडरची गळती होऊन झालेल्या आगीच्या स्फोटात सतरा जण जखमी झाले. या जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
राजेशकुमार जयस्वाल, अबिना बीबी शेख, गुल्फान अली, अलिना अंसारी, मोहम्मद अब्दुलाह, आस्माबानो, फिरोज अहमद, फय्याज अन्सारी, प्रमोद यादव, अत्तझाम अन्सारी या दहा जखमींची प्रकृती स्थिर आहे, तर सतरादेवी जयस्वाल, शौकुत अली, सोनू जयस्वाल, अनुज गौतम, प्रेम जयस्वाल या पाच जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबईतील धारावी परिसर हा उद्योगधंदे आणि मानवीवस्ती असा दाटीवाटीचा असल्याने येथे दुर्घटनांची मालिकाच सुरू असते. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास धारावी, शाहूनगरातील मुबारक हॉटेलसमोरील रस्त्यावर गॅस सिलिंडरची गळती होऊन झालेल्या आगीच्या स्फोटात पंधरा जण जखमी झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दुर्घटनेवर नियंत्रण मिळवितानाच जखमींना लगेचच सायन रुग्णालयात दाखल केले. काही तासांतच अग्निशमन दलाने दोन फायर इंजिन, एक जेटीच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले.
जखमींची विचारपूस करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सायन रुग्णालयात धाव घेतली. त्यांची चौकशी करत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांनी जखमींवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती महापौरांना दिली. धारावीतील दुर्घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसले तरी स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.