राज्यातील दहावीचे १७ लाख विद्यार्थी पुढील प्रवेशाच्या स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:06 AM2021-04-22T04:06:37+5:302021-04-22T04:06:37+5:30

कस लागणार; आयटीआय, अकरावी, पॉलिटेक्निक मिळून केवळ साडेआठ लाख जागा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहावीच्या गुणांच्या आधारे राज्यातील ...

17 lakh 10th standard students in the state in the next admission competition | राज्यातील दहावीचे १७ लाख विद्यार्थी पुढील प्रवेशाच्या स्पर्धेत

राज्यातील दहावीचे १७ लाख विद्यार्थी पुढील प्रवेशाच्या स्पर्धेत

Next

कस लागणार; आयटीआय, अकरावी, पॉलिटेक्निक मिळून केवळ साडेआठ लाख जागा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या गुणांच्या आधारे राज्यातील अकरावी, तंत्रशिक्षण पदविका, आयटीआय यांसह विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतात. यंदा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षाच रद्द झाल्याने राज्य मंडळाची परीक्षा उत्तीर्ण हाेणारे यंदा १६ लाख विद्यार्थी आणि इतर मंडळाचे विद्यार्थी असे जवळपास तब्बल १७ लाख विद्यार्थी पुढच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेत सहभागी हाेतील. त्यातच आयटीआय, अकरावी, पॉलिटेक्निक मिळून केवळ साडेआठ लाख जागा असल्याने प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.

मागील काही वर्षांपासून अकरावीच्या हजाराे, लाखो जागा मार्चपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहूनही रिक्त राहत आहेत. त्यामुळे अकरावी किंवा तंत्रशिक्षण पदविका यांच्या प्रवेशासंदर्भात अडचणी निर्माण होणार नाहीत. मात्र, नामवंत महाविद्यालयातील प्रवेशासाठीची चढाओढ आणखी तीव्र होईल हे नक्की, असे मत शिक्षण सुधारणा मोहीम (सिस्कॉम)च्या संचालिका वैशाली बाफना यांनी मांडले. गुणच नसतील तर श्रेणीच्या साहाय्याने प्रवेशप्रक्रिया राबविताना गोंधळ उडू शकतो, अडचणी निर्माण होऊ शकतात. गुणांचे समानीकरण तर अवघडच असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अकरावी व इतर प्रवेश कसे आणि कोणत्या निकषांवर करावे लागतील, याबाबत विविध पर्यायांची चाचपणी शिक्षण विभागाकडून होत असल्याची माहिती मिळाली आहे.

* हे असू शकतात पर्याय :

- अंतर्गत मूल्यमापन करताना सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या अंतर्गत मूल्यमापनाचे निकष बघून राज्यातील मंडळाच्या विद्यार्थ्यांना गुण देऊन उत्तीर्ण करून अकरावी प्रवेश गुणांच्या आधारे दिला जाऊ शकतो.

-राज्य मंडळाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये समानता आणण्यासाठी बहुपर्यायी परीक्षा घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचाही पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो, जेणेकरून त्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश दिला जाऊ शकेल.

- नववी आणि दहावी संयुक्त मूल्यमापन करून अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल दिला जाऊ शकतो. याच निकालाच्या आधारावर अकरावीसह इतर प्रवेश प्रक्रियांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.

* शैक्षणिक प्रगतीचे काय?

राज्य मंडळ स्वायत्त असताना, त्याची व्याप्ती मोठी असताना आपण इतर मंडळांच्या निर्णयामागे फरपटत जाण्यापेक्षा जूनपर्यंत वाट पाहून दहावीची परीक्षा घ्यायला हवी होती. हेच दहावीचे विद्यार्थी मागील वर्षी अंतर्गत मूल्यमापनाने दहावीत आले, आता हेच विद्यार्थी पुन्हा तसेच अकरावीत जाणार. यामध्ये त्यांची शैक्षणिक प्रगती किती झाली, हे कुठेच अधोरेखित होत नसल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मांडले.

दहावीतील विविध मंडळांची विद्यार्थीसंख्या

मंडळ - विद्यार्थी

सीबीएसई - ७०,२४७

आयसीएसई - २२,६३०

आयबी - २,७८२

राज्य मंडळ - १६,९९,०१९

* मागील वर्षी उपलब्ध जागांची संख्या

अकरावी - ५,१९,३४४

आयटीआय - १,४५,०००

डिप्लोमा- १,०५,०००

Web Title: 17 lakh 10th standard students in the state in the next admission competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.