Join us

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पडला १७ लाखांना, कोट्यवधीचे गिफ्ट मिळाल्याचे ‘आॅनलाइन’ आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:57 AM

व्हॉट्सअ‍ॅपवर खणाणलेल्या मेसेजमुळे आजीबाईच्या भुवया उंचावल्या. कोट्यवधीचे गिफ्ट लागल्याचे समजताच, त्यांनीही कोट्यधीश होण्याचे स्वप्न रंगविले.

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपवर खणाणलेल्या मेसेजमुळे आजीबाईच्या भुवया उंचावल्या. कोट्यवधीचे गिफ्ट लागल्याचे समजताच, त्यांनीही कोट्यधीश होण्याचे स्वप्न रंगविले. आॅनलाइन गिफ्टवर कस्टम ड्युटीच्या नावाखाली ठगांनी आजीबाईकडून १७ लाख उकळले. त्यानंतर, आपली फसवणूक झाल्याचे आजीबार्इंच्या लक्षात आले. ही घटना दहिसरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.दहिसर कांदरपाड्याच्या हरेश्वर पॅराडाइसमध्ये ३०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये ६६ वर्षांच्या थेरेसा अरान्हा राहतात. गेल्या महिन्यात १० जानेवारीला ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून त्यांना एक मेसेज आला. त्यामध्ये त्यांना कोट्यवधीचे गिफ्ट मिळाल्याचे कळविण्यात आले. ‘तुम्हाला अमुक कंपनीची ज्वेलरी, आयफोन आणि काही डॉलर्स बक्षीस मिळाले आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी द्यावा लागेल, तसेच कस्टम ड्युटी भरावी लागेल,’ असे या मेसेजमध्ये होते. हा मेसेज खरा वाटल्याने त्यांनी जवळपास १७ लाख १६ हजार ५०० रुपये नेट बँकिंगमार्फत संबंधित खात्यात जमा केले.मात्र, पैसे भरूनही गिफ्ट मिळत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. तेथून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर अरान्हा त्यांनी एमएचबी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमएचबी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, ते अधिक तपास करत आहेत.