17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 10 आणि 13 डिसेंबरला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 07:31 PM2017-11-07T19:31:07+5:302017-11-07T19:31:15+5:30
10 सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 10 डिसेंबर व 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
मुंबई : राज्यातील विविध 17 नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच जेजुरी नगर परिषदेचे अध्यक्ष व इतर विविध ठिकाणच्या 10 सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 10 डिसेंबर व 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
सहारिया यांनी सांगितले की, सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 28 नोव्हेंबर 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. 11 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
डहाणू, जव्हार, हुपरी, जत, नंदुरबार, नवापूर, तळोदा, किनवट, चिखलदरा, पांढरकवडा व आमगांव या 11 नगरपरिषदांचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी; तसेच वाडा, फुलंब्री, सिंदखेडा व सालेकसा या चार नगरपंचायतींचे सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारली जातील. 25 नोव्हेंबर 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 13 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर 2017 रोजी होईल.