मुंबई: मालाडमधील खासगी शिकवणी शिक्षक मुकेश यादव (२६) याला बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपर व्हायरलप्रकरणी अटक केल्यावर ‘त्या’ व्हॉट्सॲप ग्रुपमधील १७ मुलांची चौकशी विलेपार्ले पोलीस करणार आहेत. आरोपीला ज्याने पेपर पाठविला त्याचे मोबाईल चॅट डिलीट केल्याचे तपासात उघड झाले आहे.
परीक्षा देण्यासाठी उशिरा आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीमुळे पेपर लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ही मुलगी १० च्या पेपरला जवळपास १० वाजून ५० मिनिटाच्या सुमारास पोहोचली. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिचा मोबाईल तपासला तेव्हा त्यात असलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये १७ विद्यार्थी होते. तर दुसऱ्या एका चॅटमध्ये आरोपी शिक्षक यादव याने या विद्यार्थिनीला १५ प्रश्नांची उत्तरे पाठविली, असेही आढळल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर आम्ही या विद्यार्थिनीला रसायनशास्त्राच्या पेपरला उपस्थित राहू दिले नाही. परंतु तिला उर्वरित पेपरला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रसायनशास्त्राच्या पेपरला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याने मोबाईल फोनसह वर्गात प्रवेश केल्यावर प्रश्नपत्रिकेचा फोटो क्लिक केला आणि तो आरोपी यादवला व्हॉट्सॲपवर शेअर केला. मात्र यादवने ते चॅट डिलीट केल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ निरीक्षक संजय नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही आरोपीला युनिव्हर्सिटी कायद्याच्या विविध कलमांखाली एका विद्यार्थिनीसोबत प्रश्नपत्रिका शेअर केल्याबद्दल आणि बेकायदेशीरपणे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत केल्याबद्दल अटक केली आहे. तसेच व्हॉट्सॲप ग्रुपमधील १७ विद्यार्थ्यांची चौकशी करीत आहोत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.’
मग ट्रॅफिक कुठे लागले ?
विद्यार्थिनी परीक्षा केंद्रात जवळपास ४० ते ५० मिनिटे उशिरा आल्याने केंद्रातील मुख्याध्यापक यांनी तिला उशीर का झाला, असे विचारले. त्यावर रस्त्यावर ट्रॅफिक होते, असे उत्तर तिने दिले. त्यानंतर तू मालाडवरून कशी आली, अशी विचारणा केल्यावर मी ट्रेनने आली, असे तिने सांगितले. संशय आल्यावर मुख्याध्यापकांनी तिचा मोबाईल पडताळणीसाठी मागितला.पण त्यास तिने नकार दिला. तेव्हा तेथे उपस्थित पोलिसांना तिचा मोबाईल तपासण्यास सांगण्यात आले आणि सगळा प्रकार उघड झाला.