Join us

मार्च महिन्यात मुंबईत १७ हजार ७२८ घरांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:06 AM

  मुंबई : २०२१ च्या ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क नोंदणीत देण्यात आलेली सवलत, गृहकर्जांवर बँकांचे आकर्षक व्याजदर, तसेच विकासकांनी ...

 मुंबई : २०२१ च्या ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क नोंदणीत देण्यात आलेली सवलत, गृहकर्जांवर बँकांचे आकर्षक व्याजदर, तसेच विकासकांनी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या डिस्काउंट ऑफर्स यामुळे मागील काही महिन्यांपासून घर खरेदीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. २०२१ च्या मार्च महिन्यात मुंबईत एकूण १७ हजार ७२८ घरांची विक्री झाली. यामुळे रियल इस्टेट क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

मार्च महिन्यातील या घरांच्या विक्रीमुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या स्वरूपात राज्य सरकारच्या तिजोरीत ८७४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. ॲनारॉक संस्थेने सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

२०२० मध्ये लॉकडाऊनमुळे अनेक महिने बंद असलेली वाहतूक तसेच कामगारांचे स्थलांतर यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला सुरुवातीला मोठी झळ सोसावी लागली. मात्र घर विक्रीसाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग, ऑनलाइन विक्री त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने मुद्रांक नोंदणी शुल्कात केलेल्या कपातीमुळे मुंबईत वर्षभरात प्रति महिना सरासरी १० हजार घरांची विक्री नोंदविण्यात आली. त्याचप्रमाणे विकासकांकडून येणाऱ्या भरणा रकमेतही ५० टक्क्यांची सवलत देण्यात आल्याने विकासकांवरील भार हलका होण्यास मदत झाली. यामुळे कोरोना काळातही रियल इस्टेट क्षेत्र तरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

* मुद्रांक शुल्क सवलत मार्च २०२२ पर्यंत कायम ठेवावी !

२०२० च्या डिसेंबर महिन्यात मुंबईत या काळातील सर्वाधिक म्हणजेच १९ हजार घरांची विक्री झाली. तर २०२१ च्या मार्च महिन्यात १६ दिवसांमध्येच ७ हजार घरांची विक्री झाली होती. ३१ मार्च हा मुद्रांक शुल्क सवलतीचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी मुंबईत ७८७ घरांची विक्री झाली. घर खरेदीचा दर असाच कायम ठेवायचा असल्यास राज्य सरकारने मुद्रांक शुल्क सवलतीचा कालावधी मार्च २०२२ पर्यंत कायम ठेवायला हवा, अशी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी असून यासाठी अनेक विकासकांनी राज्य सरकारला मागणीचे पत्रही पाठवली आहे. 

टॅग्स :घरमुंबई