मुंबई : घरबसल्या डॉक्टरांकडून मोफत सल्ला घेण्यासाठी सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून एक उत्तम पर्याय दिला आहे. ई-संजीवनी ऑनलाइन मोफत ओपीडी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून कोणताही गरजू नागरिक घरीच राहून आपल्या आरोग्याविषयी ‘संजीवनी ओपीडी’ या ॲपद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांसोबत मोफत सल्लामसलत करू शकतो. या योजनेचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि चॅटचा वापर
‘ई-संजीवनी’ मोफत आहे, राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी ‘ई-संजीवनी’ अंतर्गत वेबसाइट आणि ॲप येथे आहे. दिवस ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वैद्यकीय अधिकारी ‘ई-संजीवनी’ सेवेमार्फत रुग्णांना त्यांच्या आजारावर सल्ला देतात. दररोज सकाळी ९ ते १ आणि दुपारी १.४५ ते सायंकाळी ५.०० यावेळेत ‘ई-संजीवनी’ सुरू असते. रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि चॅटचा वापर करून घरबसल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करता येते.
नोंदणी कशी करालमोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळख क्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो. लॉगइनसाठी एसएमएसद्वारे नोटिफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकाच्या आधारे लॉगइन करता येते, डॉक्टरांशी चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.