मुंबई : औरंगाबाद येथे राहणा-या १७ वर्षीय आसरा शेख हिला दोन वर्षांपूर्वी हेपॅटायटीसची लागण झाल्यामुळे तिचे यकृत खराब झाले होते. गेल्या दोन वर्षांत अनेक उपचार करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. महाविद्यालयात जाण्याच्या वयामध्ये रुग्णालयात ये-जा सुरू झाली. त्यात घरची परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक चणचणही जाणवू लागली. अशातच मुंबई सेंट्रल येथील एका रुग्णालयात डॉक्टरांनी तिची जबाबदारी घेऊन आसराच्या आयुष्यातील ‘विघ्न’ दूर केले. त्यामुळे तिच्यावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून, तिची तब्येत आता पूर्ववत होते आहे.यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. अनुराग श्रीमाल औरंगाबाद येथे आसराच्या कुटुंबीयांना भेटले असता आईवडिलांनी बेताच्या आर्थिक परिस्थितीबाबत सांगितले. अभ्यासात हुशार असणारी आसरा या आजारामुळे भविष्यात शिक्षण घेऊ शकणार नव्हती. डॉ. अनुराग श्रीमाल यांनी रुग्णालयाचे संचालक डॉ. हबील खोराकीवाला यांच्याशी चर्चा करून आसराला मुंबईत आणले. मुंबईत आल्यानंतर खरी कसोटी होती ती म्हणजे यकृत प्रत्यारोपणासाठी लागणारे यकृत व २० लाखांचा निधी जमविणे. डॉ. अनुराग श्रीमाल यांनी तिच्या आईची वैद्यकीय तपासणी करून तिचे यकृत मुलीला वापरू शकतो, असा निष्कर्ष काढून त्यासाठी लागणाºया निधीसाठी सोशल मीडियामार्फत मदतीसाठी आवाहन केले.इंटरनेट, सोशल मीडिया, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था तसेच सरकारी कार्यालये अशा सर्वांमार्फत हळूहळू मदतीचा ओघ सुरू झाला. आसराच्या भावानेही निधी गोळा करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. जुलैच्या सुरुवातीला मुंबई सेंट्रल येथील रुग्णालयात आईचे ६० टक्के यकृत वापरून आसरावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. गेल्याच आठवड्यात आसराला घरी पाठविण्यात आले आहे. आसराला पुढील आयुष्यात एक चांगली चित्रकार बनायचे आहे. दरम्यान, तिने रुग्णालयामध्ये असताना अनेक चित्रे काढून डॉक्टरांना भेट स्वरूपात दिली आहेत.- यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आसराला घरी पाठविण्यात आले आहे. तिला भविष्यात एक चांगली चित्रकार बनायचे आहे. दरम्यान, तिने रुग्णालयामध्ये असताना अनेक चित्रे काढून डॉक्टरांना भेट स्वरूपात दिली आहेत.
१७ वर्षीय ‘आसरा’ला आईचे यकृत, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 5:38 AM