चार वर्षात आयआयटीच्या जागामध्ये १७०० ची भर, यंदा ३५५ जागा अधिक

By रेश्मा शिवडेकर | Published: June 12, 2024 08:16 PM2024-06-12T20:16:50+5:302024-06-12T20:17:02+5:30

मुंबई : देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) पदवी स्तरावरील जागांची संख्या वीस ...

1700 addition to IIT seats in four years | चार वर्षात आयआयटीच्या जागामध्ये १७०० ची भर, यंदा ३५५ जागा अधिक

चार वर्षात आयआयटीच्या जागामध्ये १७०० ची भर, यंदा ३५५ जागा अधिक

मुंबई : देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) पदवी स्तरावरील जागांची संख्या वीस वर्षांपूर्वी अवघी सव्वा दोन हजाराच्या आसपास होती. मात्र, जुन्या आयआयटीतील जागा वाढविण्याबरोबरच नवीन आयआयटी सुरू करण्याला काँग्रेसप्रणित यूपीए आणि भाजपप्रणित एनडीए सरकारने दिलेल्या प्राधान्यामुळे देशातील आयआयटीची संख्या सातवरून २३ वर तर त्यामधील जागांचा संख्या सव्वा दोन हजारावरून यंदा १७ हजार ७४० वर गेली आहे. गेल्या चार वर्षातच आयआयटीच्या एकूण जागांमध्ये १७०० ची भर पडली आहे.

आयआयटी-आयआयएमध्ये ओबीसींकरिता आरक्षण लागू केल्यानंतर त्यावेळेस अवघ्या सात असलेल्या आयआयटींची संख्या वाढविण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले. तसेच, त्यावेळी अस्तित्त्वात असलेल्या मुंबई, मद्रास, दिल्ली, खरगपूर, गुवाहाटी, कानपूर, रूरकी या मोजक्या सात आयआयटीतील जागांची संख्याही टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. २००२-०३ साली आयआयटीच्या अवघ्या २,२७४ पदवीच्या जागा देशस्तरावर उपलब्ध होत्या. त्यामुळे प्रवेशासाठी जीवघेणी चढाओढ असे. परंतु, ओबीसी आरक्षणामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून संस्थांची व जागांची संख्या टप्प्याटप्प्याने  वाढविण्यात आली.

यंदा ३५५ जागा अधिक

आयआयटी, एनआयटी आणि आयआयआयटी या केंद्रीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशांची जबाबदारी असलेल्या जॉईंट सीट अलॉकेशन अथॉरिटीने आयआयटीच्या जागांचा तपशील मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार देशातील २३ आयआयटीतील पदवीच्या प्रथम वर्षाची जागांची संख्या गेल्या वर्षीच्या १७,३८५ वरून १७,७४० गेली आहे. यंदा मुंबई, मद्रास, खरगपूर, जोधपूर, गांधीनगर, पाटणा, गुवाहाटी, भुवनेश्वर, भिलई, तिरूपती आणि धारवाड या आयआयटीमध्ये किमान १० आणि कमाल ८५ जागा (एकूण ३५५) वाढल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत आयआयटीच्या जागांमध्ये झालेली वाढ

२०२० - १६,०६१

२०२२ - १६,५९८

२०२३ - १७,३८५

२०२४ - १७,७४०

देशभरात २३ आयआयटी

मुंबई, मद्रास, दिल्ली, खरगपूर, गुवाहाटी, कानपूर, रूरकी, हैदराबाद, बीएचयू, इंदूर, धनबाद, भुवनेश्वर, पाटणा, मंडी, रोपार, गांधीनगर, जोधपूर, धारवाड, तिरूपती, भिलई, पलक्कड, जम्मू, गोवा.

नवीन अभ्यासक्रम

देशभरातील २३ आयआयटीमध्ये एकूण २९५ विषय निवडता येतात. यंदा आयआयटी मुंबई इंडस्ट्रीअल इंजिनिअरिंग आणि ऑपरेशन्स रिसर्च या विषयात दोन अभ्यासक्रम सुरू करणार आहे. तर मद्रास डाटा सायन्स आणि एआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करत आहे. खरगपूरही एआयकरिता ३० जागा ठेवणार आहे. गांधीनगर आयआयटी इंटिग्रेटेड सर्किट डिझाईन आणि टेक्नॉलॉमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करत आहे. तर आयआयटी भुवनेश्वर इंजिनिअरिंग फिजिक्स या विषयात अभ्यासक्रम राबविणार आहे.

Web Title: 1700 addition to IIT seats in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.