भुयारीकरणाच्या कामासाठी १७०० कर्मचारी कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:10 AM2019-06-18T01:10:33+5:302019-06-18T06:25:33+5:30
प्रतिदिन होते ४७.५ मीटर भुयारीकरणाचे काम
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशतर्फे (एमएमआरसी) मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम करण्यात येत आहे. या मार्गासाठी एकूण ५६ किमीचे भुयारीकरण करण्यात येणार असून आत्तापर्यंत २८ किमी भुयारी मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे भुयारीकरणाचे काम निर्धारित वेळेमध्ये पूर्ण व्हावे यासाठी कुलाबा-बांद्रा-सीप्झ या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामासाठी सुमारे १७०० कर्मचारी आणी अधिकारी कार्यरत असून १७ टनेल बोरिंग मशिनचा (टीबीएम) वापर करण्यात येत आहे. तर प्रतिदिन सरासरी ४७.५ मीटरच्या भुयारीकरणाचे काम करण्यात येत असल्याचे एमएमआरसीतर्फे सांगण्यात आले आहे.
कुलाबा-बांद्रा-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम करणे आव्हानात्मक आहे. मुंबईतील जुन्या इमारती, मिठी नदी आणि उन्नत मुंबई मेट्रो-१ याखालून भुयारीकरण करणे जिकिरीचे आहे. हे आव्हान पेलण्यासाठी सुमारे १७०० कर्मचारी आणि अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मेट्रो प्रकल्पात भुयारीकरणाप्रमाणे खोदकाम, बेसस्लॅब, कॉनकोर्स स्लॅब, कॉलम तसेच भिंतींची बांधणी यासारखी कामे देखील सुरू आहेत.
एकूण भुयारीकरणापैकी आजवरचा सर्वात मोठा भुयारीकरणाचा टप्पा विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळ (३.९ किमी) हा असून सर्वात लहान सारिपुत नगर ते सीप्झ (५६२ मीटर) हा आहे. २८ किमी भुयारीकरणासाठी एकूण १९,४९५ सेगमेंट रिंग्सचा वापर झाला आहे. हे सेगमेंट रिंग्स मुंबईतील ६ कास्टिंग यार्ड मध्ये तयार होत आहेत ज्यापैकी ४ वडाळा, १ माहुल तर १ जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे आहे. एकूण ३३.५ किमीच्या मार्गिकेवरील उर्वरित भुयारीकरण आणखी १९ टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामात १९,५०४ सेगमेंट रिंग्स बनविण्यासाठी १,४५,५८६ घनमीटर इतक्या घनमीटर सिमेंटचे प्रमाण होते, तर १९,५०४ सेगमेंट रिंग्स बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्टीलचे प्रमाण ११,९८३.३८ मेट्रिक टन इतके होते असे एमएमआरसीमार्फत सांगण्यात आले.