लीवे कंपनीचा ८ बँकांना १७३ कोटींचा गंडा; मुंबईत सीबीआयकडून गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 09:03 AM2023-05-25T09:03:15+5:302023-05-25T09:03:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाहन, रिटेल, टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील मालाच्या आवक-जावक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लीवे लॉजिस्टिक लि. कंपनीने बँक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहन, रिटेल, टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील मालाच्या आवक-जावक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लीवे लॉजिस्टिक लि. कंपनीने बँक ऑफ इंडियाप्रणीत आठ बँकांनी दिलेल्या कर्ज प्रकरणात एकूण १७३ कोटी १८ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी सीबीआयने कंपनीचे संचालक संजय सिन्हा, नमिता सिन्हा, आकांक्षा श्रीवास्तव, हसानंद नानानी, सौरभ श्रीवास्तव, गिरिश गुप्ता अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, कॅनरा बँक व बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांनी कंपनीला कर्ज दिले होते. उपलब्ध माहितीनुसार, मुंबईतील पवई येथील हिरानंदानी गार्डन्स येथून कारभार करणाऱ्या लीवे कंपनीने बँक ऑफ इंडियाच्या अंधेरी येथील मिड कॉर्पोरेट ब्रँचमधून विविध कर्ज सुविधा घेतल्या होत्या. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता कंपनीने प्रामुख्याने कर्जप्राप्त रकमेपैकी मोठी रक्कम ही मे. लीवे मॅनेजमेंट, मे. लीवे इन्फ्रास्ट्रक्चर, लीवे मॅनपॉवर, लीवे फ्लीज मॅनेजमेंट या स्वतःच्याच अन्य कंपन्यात वळवली.
कर्ज देताना निश्चित केलेल्या अटींमध्ये अशा प्रकारे पैसे स्वतःच्याच अन्य कंपन्यांत वळविण्याच्या मुद्याचा समावेश नव्हता. याचसोबत कंपनी ज्या उद्योगात काम करते आणि त्या उद्योगाच्या अनुषंगाने कंपनीचा ज्या पूरक कंपन्यांशी संबंध येऊ शकतो, त्या कंपन्यांखेरीजदेखील संबंध नसलेल्या कंपन्यांशी कंपनीने आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आले.