Join us

दिवसभरात १.७५ लाख जणांचा देशांतर्गत विमान प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:06 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवाशांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गुरुवारी दिवसभरात १ लाख ७५ हजार ५५७ ...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवाशांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गुरुवारी दिवसभरात १ लाख ७५ हजार ५५७ जणांनी देशांतर्गत प्रवासासाठी हवाई मार्गाचा वापर केला. या प्रवाशांच्या सेवेसाठी देशभरातील विविध विमानतळांवरून ४ हजार ७६ विमानांनी उड्डाण घेतले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम प्रवासी संख्येवरही दिसून येत आहे. मार्चमध्ये दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी अडीच लाख इतकी नोंदविण्यात आली होती.

..............................

कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मंजूर

मुंबई : केंद्रीय वित्त मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे देशातील एलआयसीमधील सर्व वर्गांतील कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ मंजूर केली आहे. विशेष भत्त्यासहित पाच दिवसांचा आठवडाही प्रलंबित मंजूर करण्यात आली आहे. ऑल इंडिया नॅशनल लाइफ इन्शुरन्स एम्प्लॉइज फेडरेशनचे महासचिव राजेश निंबाळकर यांनी वेतनवाढीबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले.

------------------------

जुहू विमानतळावर अग्निसुरक्षा सप्ताह

मुंबई : जुहू विमानतळावर अग्निसुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाचे औचित्य साधून या उपक्रमास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी अग्निशमन दलात सेवा बजावणाऱ्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यात आला. अग्निसुरक्षा सप्ताहानिमित्त २० एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

---------------------------

एनआयओएस मंडळाकडून लवकरच निर्णय जाहीर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

एनआयओएस (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग) मंडळाच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा संदर्भ बाबतीतही परिस्थिती पाहून २० मे २०२१ पर्यंत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थी हिताचाच निर्णय मंडळाकडून घेतला जाणार असून जून २०२१ पर्यंत परीक्षासंबंधी सर्व निर्णय मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात येतील, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.