मुंबई : स्वामी समर्थनगर ते कांजुरमार्ग या मेट्रो-६ मार्गिकेसाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेने १७७० कोटी रुपयांच्या कर्जपुरवठ्याला मान्यता दिली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या २८व्या बैठकीत या कर्जपुरवठ्याला मंजुरी दिल्याची माहिती हाती आली आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत हा कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. यापूर्वी ‘एनडीबी’ने मेट्रो २ अ आणि ७ साठी १६५२ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केलेला आहे.
स्वामी समर्थनगर (लोखंडवाला) -जेव्हीएलआर-सीप्झ-पवई- कांजुरमार्ग अशा १४.४७ किमी मार्गावर मेट्रो-६ धावणार आहे. इन्फिनिटी मॉल (मेट्रो-२), जेव्हीएलआर (मेट्रो-७), सीप्झ (मेट्रो-३), जोगेश्वरी (पश्चिम रेल्वे आणि कांजुरमार्ग (मध्य रेल्वे) या स्थानकांना ही मार्गिका संलग्न असेल. या मार्गिकेवर एकूण १३ स्टेशन्स असतील. या प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार ७१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
दिल्ली मेट्रो रेल महामंडळ (डीएमआरसी) यांच्याद्वारे ठेव अंशदान कार्यतत्त्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कर्जपुरवठ्याला फेब्रुवारी, २०२०मध्ये एनडीबी बँकेच्या संचालक मंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली होती. झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज वितरणास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. यापूर्वी ‘एनडीबी’ने मेट्रो २ अ आणि ७ साठी १६५२ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केलेला आहे.मृदा परीक्षणाचे ८४ टक्के काम पूर्णप्रकल्पाच्या ठिकाणाच्या मृदा परीक्षणाचे (सॉईल टेस्टिंंग) ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. युटीलिटी (५७), पायलिंग (४६), पाईल कँप (२९), पाईल वर्क (२०) आणि स्टेशनची १५ टक्के कामे पूर्ण झाली आहे. आॅक्टोबर, २०२२ पर्यंत ही मेट्रो रेल्वे कार्यान्वित करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोना संकटामुळे झालेला खोळंबा आणि अन्य आघाड्यांवरील अडचणींमुळे या मार्गावर मेट्रो धावण्यास २०२३ साल उजाडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर २०३१ पर्यंत या मार्गावर दररोज ७ लाख ७० हजार प्रवासी ये-जा करतील असा अंदाज आहे.