Join us

चुकीच्या पद्धतीने आकारलेला १८ कोटींचा दंड म्हाडाकडून माफ, अभ्युदयनगर रहिवाशांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 4:03 AM

अभ्युदयनगर रहिवाशांवर चुकीच्या पद्धतीने आकारलेले सेवा शुल्क, पाणीपट्टीवरील दंड आणि अतिरिक्त विद्युत आकार माफ करण्याच्या निर्णय मुंबई म्हाडाने घेतला आहे.

मुंबई  - अभ्युदयनगर रहिवाशांवर चुकीच्या पद्धतीने आकारलेले सेवा शुल्क, पाणीपट्टीवरील दंड आणि अतिरिक्त विद्युत आकार माफ करण्याच्या निर्णय मुंबईम्हाडाने घेतला आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे सुमारे १८ कोटी रुपयांचे शुल्क माफ होत असून त्याचा मोठा दिलासा अभ्युदयवासीयांना मिळाला आहे. म्हाडाने एप्रिल २०१८ पासून नवीन पद्धतीने सेवा शुल्क आकारले होते. त्यामध्ये १५० रुपयांचे सेवाशुल्क १०२७ रुपये केले होते. तर त्यानुसार १९९८ ते २०१८ पर्यंतच्या फरकाची रक्कम भरण्याची नोटीस रहिवाशांना दिली होती. प्रत्येकी लाख - दीड लाख रुपयांचा फरक तातडीने भरायचा असल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. आता सेवाशुल्काच्या आकारणीमध्येही म्हाडा सुसूत्रता आणणार असून, तो निम्म्यावर येणार आहे. त्यामुळेही रहिवाशांची मोठी बचत होईल. यासंदर्भात अभ्युदयनगर रहिवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार काटकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून शुल्क आकारणीतील त्रुटी म्हाडाच्या लक्षात आणून दिल्या होत्या. मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी त्याची दाखल घेतली. तसेच एक विशेष बैठक बोलावून हा विषय निकालात काढला.अभ्युदयनगरमध्ये एकूण ३४१० सदनिका असताना पालिका आणि म्हाडा यांच्याकडे त्याची वेगवेगळी नोंद होती. पालिकेच्या जल मापके विभागाकडे केवळ २०३४ सदनिकांची नोंद आहे. तर मुंबई मंडळाच्या लेख विभागाकडे २८५९ सदनिकांची नोंद आहे. अभ्युदयनगरमध्ये ८ पाणी मीटर अनेक वर्षे बंद अवस्थेत होते. तरीही टेलिस्कोपिक पद्धतीने पाणी बिल आकारले जात होते. म्हाडाने हे ८ पाणी मीटर एप्रिल २०१८ मध्ये दुरुस्त करून घेतले; पण त्याचे रिडिंग न घेताच चुकीची पाणी बिले दिली जात होती.सभापती मधू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत म्हाडाच्या त्रुटी, सदनिकांच्या नोंदी दुरुस्त करून पालिकेचा दंड म्हाडानेच भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अतिरिक्त जमा झलेल्या रकमेतून थकबाकी वजा करण्यात येणार आहे. तर पुढील पाणी बिलामध्ये भरलेली अतिरिक्त रक्कम अ‍ॅडजस्ट केली जाणार आहे. आता म्हाडा सुधारित पद्धतीने नव्याने सेवा शुल्क भरून घेईल; त्यानुसार भरणा करून त्याची रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन रहिवासी संघातर्फे करण्यात आले आहे. रहिवाशांना दिलासा दिल्याबद्दल महासंघाने मधू चव्हाण यांचे आभार मानले आहेत.्रपाणीपट्टी म्हाडाकडून पालिकेला मिळत नव्हतीरहिवाशांनी नियमितपणे पाणीपट्टी म्हाडा शुल्काद्वारे भरूनही म्हाडाकडून पालिकेला ती रक्कम वेळेत हस्तांतरण होत नव्हती. परिणामी, पालिकेकडून अतिरिक्त दंड-व्याज आकारले जात होते. तसेच अभ्युदयनगरात एकूण ४८ गृहनिर्माण संस्था असून त्या आपले वीज बिल स्वत: नियमितपणे भरतात. तरीही सार्वजनिक दिव्यांच्या आकाराखाली म्हाडा प्रत्येक सदनिकाधारकांकडून वाढीव सेवाशुल्कामध्ये प्रतिमाह ११२ रुपये वसूल करीत होते. विशेषत: सार्वजनिक दिव्यांचे वीज बिल बेस्टकडूनही कधी आकारले जात नाही. तरीही म्हाडाकडून त्याची वसुली होत होती. ती रद्द करण्याची मागणी होती.

टॅग्स :म्हाडामुंबई