रिलायन्सला १८ कोटींचा दंड
By admin | Published: May 27, 2015 12:22 AM2015-05-27T00:22:30+5:302015-05-27T00:22:30+5:30
तीन महत्त्वाचे रस्ते परवानगीविनाच खोदणाऱ्या रिलायन्स कंपनीला महापालिकेने तब्बल १८ कोटी रुपये दंड ठोठावला आहे़
मुंबई : तीन महत्त्वाचे रस्ते परवानगीविनाच खोदणाऱ्या रिलायन्स कंपनीला महापालिकेने तब्बल १८ कोटी रुपये दंड ठोठावला आहे़ अंधेरी पूर्व आणि मरोळ येथील तीन नवीन रस्ते कंपनीने ‘फोर जी’ कनेक्शन टाकण्यासाठी खोदले होते़ या कारवाईमुळे अन्य कंपन्यांनाही जरब बसेल, असा विश्वास पालिकेला वाटतो आहे़
‘के’ पूर्व विभागातील मकवाना मार्ग, दी हिंदू फे्रन्डस सोसायटी मार्ग आणि दी मरोळ मिलिट्री हे तीन रस्ते सदर कंपनीने परस्पर खोदले़ याची गंभीर दखल घेऊन पालिकेने कंपनीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती़ मरोळ मिलिट्री रस्त्याचा एक कि़मी़ पट्टा पालिकेच्या मध्यवर्ती यंत्रणेमार्फत काँक्रीटचा करण्यात येत आहे़ हे काम डिसेंबरमध्ये सुरू होऊन पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते़ मात्र फोर जी केबल्स टाकण्यासाठी रिलायन्सने हा रस्ता खोदला़ यामुळे काँक्रिटीकरणाचा खोळंबा झाला. स्थानिक साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या आदेशानुसार वॉर्डातील रस्ते विभागाने पाहणी करून कंपनीला दंड ठोठावला़ हा दंड कंपनीने पालिकेकडे यापूर्वी जमा केलेल्या अनामत रकमेतून वजा करून घेण्यात येणार आहे़ यापूर्वीही टेलिकॉम कंपन्यांच्या खोदकामांमुळे जलवाहिनी फुटणे, रस्ते उखडण्याचे प्रकार घडले आहेत़ परंतु रिलायन्स कंपनीकडून याबाबत अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही़ (प्रतिनिधी)
च्मुंबईत १९४७ कि़मी़ रस्त्यांचे जाळे आहे़
च्यापैकी दरवर्षी सरासरी चारशे कि़मी़ रस्त्यांचे खोदकाम विविध कंपन्यांमार्फत केले जाते़
च्वायू, वीज, टेलिफोन अशा भूमिगत केबल्स टाकून ही सेवा देणाऱ्या सुमारे ४० कंपन्या मुंबईत आहेत़
च्या वर्षी आतापर्यंत तीनशे कि़मी़ रस्त्यांच्या खोदकामांना पालिकेने परवानगी दिलेली आहे़ मात्र अनेक ठिकाणी मोठ्या कंपन्या परस्पर खोदकाम करीत असतात़
च्मुंबईतील रस्ते चकाचक करण्याच्या तीन वर्षांच्या मास्टर प्लॅननुसार रस्त्यांचे संकल्प चित्र व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सल्लागारांचे पॅनल स्थापन करण्यात येत आहे़
च्रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरणासाठी आतापर्यंत ५९८ रस्ते खोदण्यात आले आहेत़