मुंबई : भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांमधील वैविध्यातील एकतेचे दर्शन घडवण्यासाठी कला व संस्कृती प्रेमींना आमंत्रित करत नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सने (एनसीपीए) मुंबई डान्स सीझनच्या पाचव्या पर्वाची घोषणा केली आहे. १८ दिवसांच्या या सांस्कृतिक महोत्सवात शंभरहून अधिक नृत्य कलावंत २७ कार्यक्रम सादर करणार आहेत.
१८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या दरम्यान मुंबई डान्सचे पाचवे पर्व रंगणार आहे. अनेक उत्साही सादरीकरणे, व्याख्याने, प्रात्यक्षिके, कार्यशाळा तसेच ज्येष्ठ कलावंतांनी घेतलेले संवादी मास्टरक्लासेस यांचा संगम या उत्सवात घडणार आहे. प्रस्थापित कलावंत आणि उगवत्या प्रतिभेचा खिळवून ठेवणारा आश्वासक मिलाफ या उत्सवाद्वारे होणार आहे. नृत्याचे कार्यक्रम एनसीपीएच्या सर्व सभागृहांमध्ये तसेच मुंबई, बृहन्मुंबई व नवी मुंबई भागातील अन्य ठिकाणीही होणार आहेत. विविध नृत्यप्रकारांतील कलावंतांना सामूहिक उत्सवासाठी एकत्र आणणारे एक एकात्मिक व्यासपीठ निर्माण करण्याच्या दृष्टीने एनसीपीएने २०१८ मध्ये एनसीपीए मुंबई डान्स सीझन हा उपक्रम सुरू केला. आगामी हंगामाचे उद्घाटन १८ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता महोत्सवाच्या को-क्युरेटर असलेल्या आणि भरतनाट्यम व कथकली कलावंत जयश्री नायर व भरतनाट्यम कलावंत लता राजेश यांच्या हस्ते केले जाणार आहे.
या महोत्सवातील सर्व सादरीकरणे देशातील शास्त्रीय नृत्यप्रकारांचा आवाका प्रेक्षकांपुढे मांडतील. मग तो तमीळ साहित्यावर आधारित नृत्यदिग्दर्शनाचा धडा असो किंवा पंडित बिरजू महाराजांना कथकच्या स्वरूपात केलेले वंदन असो. याशिवाय या महोत्सवात परिसंवाद, पुस्तक प्रदर्शने, शास्त्रीय नृत्य व काव्य संध्या तसेच चर्चासत्रे अशा विविध उपक्रमांचाही समावेश आहे. या सीझनची अंतिम फेरी ४ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता एनसीपीएतील टाटा थिएटरमध्ये रंगणार आहे. संध्याकाळच्या कार्यक्रमाची रचना प्रख्यात मणिपूरी नृत्य कलावंत पद्मश्री दर्शना झवेरी आणि कथकमधील ज्येष्ठ कलावंत डॉ. तुषार गुहा करणार आहेत.