Join us

भिवंडीचे १८ माजी नगरसेवक सहा वर्षे निवडणुकीस अपात्र, नगर विकास विभागातील सुनावणीत मुख्यमंत्र्यांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 8:43 AM

Bhiwandi News: पक्षादेश झुगारत बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या १८ माजी नगरसेवकांवर अखेर नगर विकास विभागात झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचिकाकर्ते व काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांचे अपील मान्य करून १८ बंडखोर नगरसेवकांवर कारवाई केली.

भिवंडी येथील महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारत बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या १८ माजी नगरसेवकांवर अखेर नगर विकास विभागात झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचिकाकर्ते व काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांचे अपील मान्य करून १८ बंडखोर नगरसेवकांवर कारवाई केली. त्यांचे सदस्यत्व रद्द केले असून, १८ माजी नगरसेवकांवर ६ वर्षे निवडणूक लढविण्यासही बंदी घालणारे आदेश सोमवारी सायंकाळी उशिरा देण्यात आले आहेत. या निकालामुळे बंडखोर गटाला चपराक बसली आहे.बंडखोरीविरोधात काँग्रेस माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे १९ डिसेंबर २०१९ मध्ये याचिका दाखल करीत १८ बंडखोर सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या याचिकेवर निकाल देण्यास विलंब होत असल्याने उच्च न्यायालयाने निकाल देण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून दिल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी ३१ डिसेंबर २०२१ मध्ये जावेद दळवी यांची याचिका अमान्य करीत बंडखोर नगरसेवकांच्या बाजूने कौल दिला होता. या निकालाविरोधात दळवी यांनी नगरविकास मंत्र्यांसमोर आव्हान याचिका दाखल केली. त्यावर सोमवारी झालेल्या अंतिम सुनावणीत नगरविकास मंत्रालय सांभाळणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेला निकाल रद्द ठरवून दळवी यांची याचिका मान्य केली. नगरसेवकपद वाचविण्यासाठी या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरली होती. मात्र, त्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. काँग्रेसकडून या निकालाबाबत समाधान व्यक्त होत आहे.

नेहमी सत्याचाच विजय होतो. न्याय मिळायला उशीर झाला; पण तो सत्याच्या बाजूने आल्याने भविष्यात बंडखोरी करणाऱ्यांना मोठा धडा मिळाला आहे.    - जावेद दळवी, याचिकाकर्ते व माजी महापौर

नेमके काय घडले होते?२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ९० पैकी ४७ जागांवर काँग्रेसने विजय संपादन करून पूर्ण बहुमत मिळविले होते; परंतु अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ५ डिसेंबर २०१९ रोजी भिवंडी पालिका महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी बंडखोरी केली. अवघे ४ नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवाराला महापौर बनविले आणि बंडखोर गटाने स्वत:कडे उपमहापौरपद घेतले होते.

अपात्र नगरसेवकनमरा औरंगजेब अन्सारी, मीसबाह इमरान खान, इमरान वाली महोम्मद खान, अहमद हुसेन मंगरु सिद्दिकी, अरशद मोहम्मद असलम अन्सारी, शबनम मेहबूब रेहमान अन्सारी, अन्जूम एहमद हुसेन सिद्दिकी, मलिक नजीर मोमीन, झरीना नफिज अन्सारी, सजीदा मोमीन, शकिरा एहमद शेख, समीना सोहेल शेख, रबीया मोहम्मद शमीम अन्सारी, तफज्जुल हुसेन मकसूद हुसेन अन्सारी, शीफा अशफाक अन्सारी, नसरुल्ला नूर मोहम्मद अन्सारी, हुस्ना परवीन मोहम्मद याकूब अन्सारी व मतलूब अफजल खान.

टॅग्स :भिवंडीएकनाथ शिंदे