राज्यात १८ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:07 AM2020-12-24T04:07:27+5:302020-12-24T04:07:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात सात हजार ६२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात सात हजार ६२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १८ लाख एक हजार ७०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५१ टक्के झाले आहे, तर मृत्युदर २.५७ टक्के आहे. सध्या राज्यात ५४ हजार ५७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात बुधवारी तीन हजार ९१३ रुग्ण आणि ९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोना बाधितांची एकूण संख्या १९ लाख सहा हजार ३७१ झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४८ हजार ९६९ बळी गेले आहेत. बुधवारी नोंद झालेल्या एकूण ९३ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. राज्यात दिवसभरात नोंद झालेल्या ९३ मृत्यूंमध्ये मुंबई १४, ठाणे २, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा २, मीरा-भाईंदर मनपा १, रायगड २, वसई-विरार मनपा १, पनवेल मनपा ४, नाशिक ४, नाशिक मनपा ५, मालेगाव मनपा १, अहमदनगर ३, अहमदनगर मनपा २, जळगाव १, पुणे ३, पुणे मनपा ६, सोलापूर ७, सोलापूर मनपा १, सातारा १, औरंगाबाद ८, औरंगाबाद मनपा ५, जालना २, नांदेड २, अकोला १, अकोला मनपा २, अमरावती मनपा १, यवतमाळ २, नागपूर मनपा १, वर्धा १, भंडारा १, चंद्रपूर २, चंद्रपूर मनपा २, गडचिरोली १ इ. रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एक कोटी २२ लाख ७८ हजार ४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.५३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात चार लाख ८८ हजार ७२३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर तीन हजार ४२० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.