अतुल कुलकर्णी।
मुंबई : कामगार आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या व फॅक्टरी अॅॅक्टमध्ये नोंदणी झालेल्या राज्यातील ३६ हजार ६२३ कारखान्यांपैकी २१ हजार ६८१ कारखाने सुरू झाले आहेत. त्यातही कामगारांची उपस्थिती ५० टक्के आहे. सगळे कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले तर २८ लाख ५४ हजार ८८१ कामगार कामावर येऊ शकतात.
आजमितीला फक्त १० लाख ३२ हजार ३२९ कामगारच कामावर आहेत. त्यातही २ लाख २५ हजार ८४३ कामगार अत्यावश्यक सेवेतील कारखान्यांमध्ये कामावर आहेत. त्यामुळे राज्यातील औद्योगिक घडी पूर्णत: विस्कटून गेली आहे. मुंबईचाच विचार केला तर मुंबईत असे ५,०६० कारखाने आहेत व तेथे ३ लाख६१ हजार १०३ कामगार काम करतात. मात्र आजच्या दिवशी फक्त ६५१ कारखाने सुरू आहेत व तेथे फक्त २६ हजार १५ कामगार कामावर आहेत.एकट्या मुंबईची ही अवस्था आहे. मुंबईच्या खालोखाल वसई, पालघर येथे सगळ्यात जास्त कारखाने आहेत. पालघर येथे ३,५९६ कारखान्यांमधून २,४९,०४४ कामगार काम करत असतात. सध्या तेथे २,८३५ कारखाने चालू असून तेथे १,५१,२७० कामगार कामावर आहेत. पुण्याचे चित्रही बरे आहे.पुण्यात १,४७८ कारखाने आहेत व तेथे १,८६,५९० कामगार काम करतात. आज तेथे १,३३७ कारखाने सुरू आहेत. तेथे १,०२,३८४ कामगार कामावर आहेत.