व्यावसायिकाच्या १८ लाखांवर डल्ला मारणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:35 AM2018-08-07T02:35:09+5:302018-08-07T02:35:17+5:30
बनावट चावीच्या आधारे व्यावसायिकाच्या घरातून १८ लाखांची रोकड लुटणा-या दोन मित्रांना ताडदेव पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मुंबई : बनावट चावीच्या आधारे व्यावसायिकाच्या घरातून १८ लाखांची रोकड लुटणा-या दोन मित्रांना ताडदेव पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणात व्यावसायिकाची प्रेयसीही संशयाच्या जाळ्यात अडकली आहे. प्रेयसीची बहीण दोन आरोपींपैकी एकाची मैत्रीण निघाली. त्यामुळे प्रेयसीनेच हा लुटीचा डाव रचल्याच्या संशयातून पोलीस शोध घेत आहेत.
ताडदेव जायफळवाडी परिसरात तक्रारदार ३३ वर्षीय बांधकाम व्यावसायिक राहतात. ११ ते १५ जुलैदरम्यान ते कामानिमित्त घराबाहेर होते. त्याच दरम्यान पाढी आणि यादवने बनावट चावीच्या साहाय्याने घर उघडले आणि घरातील १८ लाखांची रोकड घेऊन ते पसार झाले.
३ आॅगस्ट रोजी ही बाब तक्रारदाराच्या निदर्शनास आली. त्याने थेट ताडदेव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपास सुरू केला. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेज लागले. त्या आधारे पोलिसांनी पाढी आणि यादवच्या मीरा रोड येथून मुसक्या आवळल्या.
दोघांकडेही पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यांना समीरच्या घरातील रोकडबाबत कसे समजले? त्यांनी चावी कशी मिळवली? आदींबाबत पोलीस शोध घेत आहेत. तक्रारदाराची प्रेयसी नालासोपारा परिसरात राहते.
प्रेयसीची बहीण समीरची मैत्रीण आहे. त्यामुळे त्यांच्यावर संशय असून त्यांचा यामागे काही हात आहे का? या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. आरोपींकडून काही रोकड जप्त करण्यात आली आहे. उर्वरित रकमेबाबत तपास सुरू असल्याची माहिती ताडदेव पोलिसांनी दिली.