अलिबाग : समाजाचा निर्णय मान्य करीत नाही, समाजाच्या म्हणण्या प्रमाणे वागत नाहीत अशा कारणांवरुन येथून जवळच असलेल्या थळ गावातील उंदेरी आळीत राहाणाऱ्या महादेव चिटके यांच्या कुटूंबाला २०१२ पासून वाळीत टाकून, त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या अन्य कोळी बांधवांना ३ हजार रुपये दंड लागू केला, शिवाय वेळोवेळी त्रास दिल्याप्रकरणी वाळीतग्रस्त दिलेश महादेव चिकटे यांच्या फिर्यादिनुसार थळ-उंदेरी आळी कोळी समाज पंचायतीच्या १८ जणांविरुद्ध शनिवारी संध्याकाळी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भागवत चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.गुन्हा दाखल झालेल्या १८ जणांमध्ये दत्ताराम लट, चंद्रकांत ढेपे, लालचंद्र आंबे, नवनाथ मलव, गंगाधर कोळी, हरिश्चंद्र कोळी, गणेश गवते, शिवराम रोगे, देवदास ढेपे, चंद्रकांत ढेपे, सखाराम ढेपे, गजेंद्र गवते, मुकूंद लट, नासिकेत लट, ज्ञानेश्वर कोळी, गजानन वारकर, राकेश कोळी व नासिकेत ढेपे यांचा समावेश असल्याचे चौधरी यांनी सांगितले.तीन हजार रुपयांची दहशतदिलेश, जालिंदर , विनायक व पवित्र या चौघा भावांचे चिटके कुटूंब थळ उंदेरी आळीत त्याच्या आजीच्या नावे असलेल्या सामायिक जागेत राहात होते. विनायक चिटके याचा स्वत:च्या मासेमारीचा व्यवसाय होता. दिलेश याचा मासळी नेणआण करण्याच्या टेम्पोचा व्यवसाय, जालिंदर याचे किराणामालाचे दुकान व पवित्र हा मच्छीमारी बोटींवर कामावर जात होते. मे २०१२ मध्ये चिकटे कुटूंबाने आपल्याच सर्वे नं.२३४/१२ मध्ये स्वत:चे पक्के घर बांधले. त्या घरामुळे शेजारच्या गावठाण सर्वे.नं.२३४/१ मधून जाणाऱ्या रस्त्याला अडथळा आल्याचा आक्षेप दत्ताराम लट व चंद्रकांत ढेपे यांनी कोळी जात पंचायतीत घेतला. परंतू प्रत्यक्षात आपल्याच स्वत:च्याच जागेत घर बांधले असल्याने चिकटे यांनी हा आक्षेप नाकारला. परिणामी, चिकटे कुटूंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय घेवून, त्याच्याशी बोलणाऱ्यास ३ हजार रुपयांचा दंड जातपंचायतीने लागू केला. त्याच वेळी जालिंदर चिटके याच्याविरुद्ध अलिबाग उप विभागीय महसुल अधिकाऱ्यांकडे जात पंचायतीच्या प्रमुखांनी तक्रार अर्ज दाखल केला. त्याची सुनावणी सीआरपीसी-१३३ अन्वये अलिबाग उप विभागीय महसुल अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असून, पूढील सुनावणी येत्या १५ एप्रिल रोजी आहे.अर्थिक नाड्या आवळल्या : मे २०१२ मध्ये या कुटूंबास जातपंचायतीने वाळीत टाकल्याने तसेच तीन हजार रुपयांच्या दंडाच्या भितीने सर्व कोळी बांधवांनी त्यांच्याशी दैनंदिन संबंध बंद केल्याने विनायकला आपल्या मालकीची बोट कमी दरात विकावी लागली. जालिंदर यांच्या दुकानावरही सर्वांनी बहिष्कार टाकल्याने त्याला दुकान बंद करावे लागले, टेम्पोला कोणी भाडे देईना. परिणामी, दिलेश याला टेम्पो देखील विकावा लागला, तर बोटीवर कामावर कोणी घेत नसल्याने पवित्र देखील रोजीरोटीस मुकला आणि संपूर्ण आर्थिक कोंडीमुळे चिकटे कुटूंबावर आर्थिक संकट आले.च्चिटके यांनी वाळीत टाकल्याप्रकरणी गेल्या २३ फेब्रुवारी रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्या अर्जाच्या अनूषंगाने वाळीत प्रथा निर्मूलनार्थ स्थापन तालुका समितीची गावात, अलिबागचे नायब तहसीलदार मिलींद मुंढे यांनी समझोता बैठक घेतली.च्परंतू जालींदर याच्यावरील सीआरपीसी-१३३ अन्वये अलिबाग उप विभागीय महसुल अधिकाऱ्यांकडे दाखल तक्रार मागे घेणार नाही, अशी भूमिका कोळी जातपंचायतीचे सदस्य व त्यांचे वकील यांनी घेतल्याने समझोता होवू शकला नाही. अखेर शनिवारी या वाळीत प्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे चौधरी यांनी अखेरीस सांगितले.
वाळीतप्रकरणी १८ जणांवर गुन्हा
By admin | Published: April 12, 2015 1:43 AM