राज्यात लस घेतलेल्या १८ जणांना डेल्टा प्लसची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:09 AM2021-08-17T04:09:37+5:302021-08-17T04:09:37+5:30
मुंबई : आतापर्यंत राज्यात ६६ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. डेल्टा प्लसच्या ६६ रुग्णांपैकी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या ...
मुंबई : आतापर्यंत राज्यात ६६ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. डेल्टा प्लसच्या ६६ रुग्णांपैकी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या १८ जणांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. १८ पैकी १० जणांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, तर ८ जणांनी लसीचा एकच डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी २ व्यक्तींनी कोव्हॅक्सिन तर इतर १६ जणांनी कोविशिल्ड या लसीचे डोस घेतले होते.
एकूण रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३४ स्त्रिया आहेत. सर्वाधिक ३३ डेल्टा प्लस रुग्ण १९ ते ४५ वयोगटातील आहेत, तर त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १८ रुग्ण आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील ७ बालके असून, ६० वर्षांवरील ८ रुग्ण आहेत. ६६ पैकी ३१ रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे ३६ रुग्ण हे जळगाव, रत्नागिरी, मुंबई या तीन जिल्ह्यांत आढळून आले आहेत.
विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करणे गरजेचे आहे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली, इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का, याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासितांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे.
पाच रुग्णांचा मृत्यू
६६ पैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३ पुरुष, २ स्त्रिया आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात २, बीड, मुंबई, रायगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले पाचही रुग्ण ६५ वर्षांवरील असून, त्यांना अतिजोखमीचे आजार होते. मृत्यू झालेल्या २ जणांनी कोविशिल्डचे डोस घेतले होते. २ जणांनी कोणतीही लस घेतली नव्हती, तर एकाच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.