Join us  

१८ हजारांवर तक्रारींचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:29 AM

महावितरणकडून राज्यभरात राबविण्यात आलेल्या ‘महावितरण आपल्या दारी’ या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे १८ हजार ५५५ ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे निराकरण करण्यात आले आहे.

मुंबई : महावितरणकडून राज्यभरात राबविण्यात आलेल्या ‘महावितरण आपल्या दारी’ या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे १८ हजार ५५५ ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे निराकरण करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते.महावितरणच्या राज्यभरातील १६ परिमंडलांत ग्राहक संपर्क अभियान राबविण्यात आले होते. या अंतर्गत राज्यभरात १ हजार ७४६ ग्राहक मेळावे घेण्यात आले. अभियानात नवीन वीज जोडणी, नावात बदल, वीजभार बदलणे याबाबतच्या अर्जांवर कार्यवाही करण्यात आली. सदोष किंवा चुकीच्या वीजबिलांची दुरुस्ती, सदोष किंवा जळालेले मीटर बदलण्यासह इतर तक्रारीही सोडविण्यात आल्या, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.राज्यात या अभियानांतर्गत एकूण सुमारे २२ हजार ९६६ तक्रारी व अर्ज प्राप्त झाले. यापैकी १८ हजार ५५५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. उर्वरित ४ हजार ४११ प्रलंबित तक्रारी निर्धारित मुदतीत सोडविण्यात येत आहेत. याची माहिती वीजग्राहकांना देण्यात येत आहे. एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी सदोष किंवा चुकीच्या वीज बिलाबाबत असून त्यावर उपाययोजना करण्यात येत आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.