पुणे – नाशिक सेमी हायस्पिड रेल्वे मार्गावर १८ बोगदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 05:34 PM2020-10-29T17:34:52+5:302020-10-29T17:35:18+5:30
Tunnels on Pune-Nashik railway line : बोगदे उभारणीसाठी महारेलचे स्वारस्य देकार
मुंबई : पुणे आणि नाशिक ही दोन शहरांतील वेगवान प्रवासासाठी सेमी हाय स्पीड रेल्वे सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काँर्पोरेशनने (महारेल) घेतला असून या मार्गावरील तब्बल २४ किमी लांबीचा प्रवास १८ बोगद्यातून करावा लागणार आहे. बोगद्यांच्या या कामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया महारेलने आता सुरू केली आहे.
मुंबई – पुणे आणि नाशिक ही तीन झपाट्याने वाढणा-या शहरे गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखली जातात. या शहरांमधला प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे आणि नाशिक या शहरांना जोडण्यासाठी परंपरागत पद्धतीच्या रेल्वे मार्गासह सेमी हायस्पिड रेल्वे सुरू केली जाणार आहे. जून, २०२० मध्ये रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता महारेलने तयारी सुरू केली आहे. घाट सेक्शनमधिल बोगद्यांच्या कामांसाठी कंत्राटदारांकडून स्वारस्य देकार दोन दिवसांपूर्वी मागविण्यात आले आहेत. त्यानुसार या मार्गावर १८ बोगदे तयार करण्याचे नियोजन असून त्यांची किमान लांबी १८० मीटर आणि कमाल लांबी ६.६४ किमी असेल. या मार्गावर परंपरागत रेल्वे ट्रँकच्या जोडीने सेमी हायस्पीड रेल्वेची स्वतंत्र मार्गिका असेल. त्यावरून ताशी २०० ते २५० किमी वेगाने रेल्वे धावतील. त्यामुळे पुणे नाशिक प्रवास हा दोन तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करणे शक्य होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १६ हजार ३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. परंपरागत मार्गांवर मालवाहतूक ताशी ११० किमी तर प्रवासी वाहतूक १६० किमी वेगाने होणार आहे.
मार्गिकेवर २४ स्टेशन्स
या रेल्वे मार्गावर पुणे, हडपसर, मांजरी, कोलवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जाम्बूत, साकूर, आंभोरे, संगमनेर, देवथान, चास, दांडी, सिन्नर, मोहादरी, शिंदी आणि नाशिक रोड ही २४ स्टेशन असतील. चाकण, सिन्नर येथील एसईझेड परिसरातल्या उद्योगधंद्यांसाठी ही मार्गिका अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.