तलावांमध्ये १८ टक्के जलसाठा शिल्लक, मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 07:51 AM2021-07-09T07:51:31+5:302021-07-09T07:52:29+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा कल पाहता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. पावसाचे दिवसही कमी झाले असून, थोड्या दिवसात जास्त पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये याच कालावधीत तलावांमध्ये २५ टक्के तर २०२० मध्ये १७.५० टक्के जलसाठा जमा होता.
मुंबई: तुरळक सरी वगळता पाऊस फिरकलाच नाही. जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै महिन्याचा पहिला आठवडाही पावसाच्या प्रतीक्षेत गेला आहे. त्यामुळे मुंबईलापाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. परिणामी, मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा कल पाहता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. पावसाचे दिवसही कमी झाले असून, थोड्या दिवसात जास्त पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये याच कालावधीत तलावांमध्ये २५ टक्के तर २०२० मध्ये १७.५० टक्के जलसाठा जमा होता. मात्र, त्यानंतर मुसळधार पावसाने तलाव भरून वाहत होते. दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वर्षभर पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांत १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. सध्या सात तलावांत मिळून दोन लाख ६३ हजार ६३१ दशलक्ष लिटर जलसाठा जमा आहे.
१९७२ मध्ये मुंबईत दुष्काळ पडला होता. त्यानंतर २००९ मध्ये अपुऱ्या पावसाने मुंबईची दैना उडवली होती. २०१४ मध्येही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. २०१८ मध्ये दहा टक्के पाणीकपात लागू होती.