Join us

आनंदाश्रू! सभेच्या बॅनरमुळे १८ वर्षापूर्वी हरवलेला सुषमा अंधारेंचा भाऊ सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 4:42 PM

१८ वर्षांनी आमची प्रतिक्षा संपली आहे. युवराज आमच्यासोबत आहेत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं सुषमा अंधारेंनी सांगितले.

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा चेहरा बनल्यात. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह वेगळी भूमिका मांडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची दयनीय अवस्था झाली. अनेक जण पक्ष सोडत असताना सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची रणरागिणी म्हणून सुषमा अंधारेंची नवी ओळख महाराष्ट्राला झाली. मात्र याच सुषमा अंधारेंना एका बॅनरमुळे त्यांचा १८ वर्षापूर्वीचा हरवलेला भाऊ सापडला आहे. 

युवराज जाधव असं सुषमा अंधारेंच्या भावाचं नाव आहे. कॉलेजमध्ये असताना वास्तव सिनेमा पाहून युवराज यांनी घर सोडलं होते. त्यानंतर १८ वर्षांनी युवराज जाधव घरी परतला आहे. काहीतरी करून दाखवायचं म्हणून तो घराबाहेर पडला होता. मात्र मुंबईत सध्या सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या सभेत सुषमा अंधारे यांचे बॅनर्स झळकत आहे. या बॅनरच्या माध्यमातून युवराज जाधव आणि सुषमा अंधारे या बहिण भावाची भेट झाली. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, १८ वर्षांनी भाऊ पुन्हा परतला हे आमच्यासाठी शॉकिंग आहे. युवराजच्या येण्यानं आम्ही सगळे कुटुंब आनंदात आहोत. भावनिक गोंधळ झाला आहे. १८ वर्षांनी आमची प्रतिक्षा संपली आहे. युवराज आमच्यासोबत आहेत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितले. तर १८ वर्षांनी मला कुटुंब भेटले त्यामुळे माझी भावना शब्दात व्यक्त करता येत नाही असं भाऊ युवराज जाधव यांनी सांगितले. 

“आयुष्यात काहीतरी करण्याच्या उद्देशाने मी घर सोडले होते. सुरुवातीला मी दोन वर्षे पुण्यात काम केले आणि घरी परतण्याचा विचार केला. पण मला त्यांच्या प्रतिक्रियेची भीती वाटली म्हणून मी तसे केले नाही. नंतर मी माहीमला स्थायिक झालो. माहिमध्ये शिवसेनेच्या एका बॅनरवर सुषमा अंधारे यांचा फोटो लावण्यात आला होता. युवराज रोजंदारीचं काम करतो. त्याने फोटो पाहून ही माझी बहीण असल्याचं मित्रांना सांगितले. परंतु मित्रांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याने माझा नंबर ऑनलाईन शोधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर फेसबुकवरून नंबर मिळाल्यानंतर त्याने मला कॉल केला आणि पुन्हा घरी परतण्याचं म्हटलं असं सुषमा अंधारे यांनी सांगितले. मात्र कुटुंबीयांनी युवराजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने ज्या क्रमांकावरून फोन केला तो बंद होता. त्यानंतर अंधारे यांनी शिवसेना नेते सचिन अहिर आणि राहुल कनाल यांच्या मदतीने युवराज जाधव यांचा शोध घेतला. स्थानिक सेनेच्या कार्यकर्त्यांनी युवराजचा पत्ता शोधत त्याला कुटुंबाशी जोडले. 

टॅग्स :सुषमा अंधारेशिवसेना