- सीमा महांगडे मुंबई : उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील २०१८-१९ मधील सर्व प्रवेश प्रक्रियेच्या पडताळणीचे कामकाज यंदा सफलता या पोर्टलद्वारे आॅनलाइन करण्यात येणार असल्याच्या सूचना उच्च शिक्षण संचलनायाने महाविद्यालयांना दिल्या. यासाठी राज्यातील महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया झालेल्या अभ्यासक्रमांची नोंदणी या पोर्टलवर करणे आवश्यक होते. मात्र अद्याप १८० अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांची नोंदणी झाली नसून त्यांची यादी सीईटी कक्षाकडून संकेतस्थळावर जारी केली आहे.बोगस शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखल्यांच्या आधारे अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासोबतच प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी पारदर्शक होण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्राधिकरण (एआरए) आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) यांनी यंदापासून सफलता पोर्टलची निर्मिती केली आहे. सुरुवातीला महाविद्यालयांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर ती दोन वेळा वाढवण्यात आली. दरम्यान पुन्हा महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी २००० रुपये व कमाल ५०,००० रुपये इतके विलंब शुल्क भरून नोंदणीची संधी दिल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. जर महाविद्यालयांनी या पोर्टलवर नोंदणी केली नाही तर त्यातील प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यता देण्यात येणार नसल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.।सफलता पोर्टल हे सीईटी सेल आणि एआरएसाठी डिजिटल लॉकरचे काम करणार आहे. रोजगाराच्या संधीसाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी पोर्टलहून करता येणार आहे. या पोर्टलवरील माहिती संबंधित विद्याशाखेच्या संचालनालयासोबत, प्रमुख शैक्षणिक प्रशासकीय यंत्रणा आणि महाभियोक्त्यांना असेल. - आनंद रायते, आयुक्त सीईटी सेल.
राज्यातील १८० अभ्यासक्रमांची अद्याप सफलता पोर्टलवर नोंदणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:55 AM