१८० कोटींच्या ठेवी एसटी बँकेतून काढल्या; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 06:39 AM2023-09-04T06:39:32+5:302023-09-04T06:39:39+5:30
बँकेत सदावर्ते गटाने एकहाती सत्ता मिळविल्यानंतर बैठकींमध्ये मांडलेल्या ठरावांवरून वाद निर्माण होत आहेत.
मुंबई : एसटी बँकेमध्ये सदावर्ते गटाने एकहाती सत्ता मिळविल्यानंतर नव्या संचालक मंडळाने घेतलेल्या मनमानी व चुकीच्या निर्णयामुळे बँक डबघाईला येत असल्याचा दावा करीत सभासदांनी तब्बल १८० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी बँकेच्या एका सभासदाने एसटी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा, अशी तक्रार सहकार आयुक्तांकडे केली आहे.
बँकेत सदावर्ते गटाने एकहाती सत्ता मिळविल्यानंतर बैठकींमध्ये मांडलेल्या ठरावांवरून वाद निर्माण होत आहेत, तर संचालकांच्या मनमानीला कंटाळून महाव्यवस्थापकांनी राजीनामा दिला होता. दीर्घ रजेवर गेलेल्या व्यवस्थापकीय संचालकांनी राजीनामा दिला. दरम्यान, कंत्राटी पदावर एमडी पदाची जाहिरातही काढली होती, तर आता अननुभवी २२ वर्षीय सौरभ पाटील यांची सव्वा लाख रुपयांच्या मानधनावर नियुक्ती केली आहे.
बँक येत आहे डबघाईला
एसटी बँकेत सदावर्ते गट सत्तेत येऊन १० जुलै रोजी नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले, परंतु या संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने आणि चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सुमारे ७० वर्षे कार्यरत असणारी बँक डबघाईला येत आहे. संचालक मंडळाच्या निर्णयामुळे १ सप्टेंबरपर्यंतच्या तपशिलानुसार, बँकेतील २,३०० कोटी रुपयांपैकी १८० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या गेल्या आहेत.
बँकेचा क्रेडिट डिपॉझिट रेशो ८५ टक्क्यांपेक्षा वर गेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, हा रेशो ७२ टक्क्यांपर्यंत असायला हवा, तो नसल्याचा अर्थ बँकेच्या स्थितीत काही डळमळीतपणा येण्याची चिन्हे असल्याचे जाणकार व्यक्त करीत आहेत. सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची आयुष्यभराची सेवानिवृत्तीनंतरची पुंजी या बँकेत आहे. संचालक मंडळाने घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयामुळे बँकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तरी आपण त्वरित चौकशी करून, संचालक मंडळ बरखास्त करावे, असेही आपल्या तक्रारीत या सदस्याने म्हटले आहे.