‘मेडिकल’चे १८० विद्यार्थी अडचणीत; कॉलेजात पुरेशी उपस्थिती नसल्याने मुकणार परीक्षेला
By संतोष आंधळे | Published: October 9, 2023 06:48 AM2023-10-09T06:48:01+5:302023-10-09T06:48:18+5:30
मुंबई : लेक्चर बंक करणे, मुद्दाम ग्रुपने कॉलेजला दांडी मारणे हे प्रकार कॉलेजांमध्ये सर्रास चालतात. मात्र, अभ्यासू वगैरे प्रतिमा ...
मुंबई : लेक्चर बंक करणे, मुद्दाम ग्रुपने कॉलेजला दांडी मारणे हे प्रकार कॉलेजांमध्ये सर्रास चालतात. मात्र, अभ्यासू वगैरे प्रतिमा असलेल्या भावी डॉक्टरांकडून आदर्श विद्यार्थ्याप्रमाणे वर्तणूक अपेक्षित असते. त्यांनी रीतसर कॉलेजला येऊन लेक्चर अटेंड करावे, प्रॅक्टिकल करावे हे त्यांच्याकडून अपेक्षित असते. मात्र, सायन आणि कूपर हॉस्पिटल व कॉलेजच्या प्रथम वर्ष वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी या सर्व नियमांना धाब्यावर बसवले. त्यामुळे दोन्ही महाविद्यालयांच्या १८० विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे.
- विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे बंधनकारक असलेली उपस्थितीची अट पूर्ण न केल्याने महाविद्यालय प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
- विद्यार्थ्यांना अनॉटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री हे तीन विषय शिकविले जातात. त्यात प्रॅक्टिकलमध्ये ८० तर थिअरी विषयात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असते.
- कॉलेज सुरू झाल्यानंतर या नियमांची माहिती विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनातर्फे दिलेली असते. मात्र, विद्यार्थ्यांनी हे नियम फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे समजते.
या संदर्भातील पालकांचे निवेदन आमच्याकडे आले असून, ते संबंधित महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना पाठविण्यात आले आहे.
-डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी किती उपस्थिती असावी, याचे काही नियम आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या प्रमाणात महाविद्यालयात उपस्थित राहणे गरजेचे असते. प्रत्येक महाविद्यालयाचे अधिष्ठाता या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात.
-डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ