विक्रोळीतून साडेतीन कोटींचा १८०० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:05 AM2021-02-14T04:05:52+5:302021-02-14T04:05:52+5:30
मुंबई पोलिसांची कारवाई ; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून मुंबईसह विविध ठिकाणी गांजाच्या ...
मुंबई पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून मुंबईसह विविध ठिकाणी गांजाच्या तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. अमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) विक्रोळी परिसरात एका ट्रकमध्ये शहाळ्याखाली लपविलेला तब्बल १८०० किलो गांजा जप्त केला. त्याची अंदाजे किंमत ३ कोटी ६० लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. आकाश सुभाष यादव (२५) व दिनेशकुमार सरोज (२६) अशी अटक आराेपींची नावे आहेत. मात्र, मुख्य सूत्रधार लक्ष्मीकांत प्रधान व संदीप सातपुते हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
प्रधान हा ओडिशामधील भरामपूर (जि. गंजम) येथील असून तेथून तो भिवंडीतील गोदामात महिन्याला सरासरी ५ टन गांजा पाठवित होता. तेथून मुंबईतील सूत्रधार सातपुते हा ताे गांजा मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर, सुरत आदी भागात विक्रीसाठी पाठवत असे, असे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सांगितले.
विक्रोळी पोलीस ठाणे बस स्टॉपजवळ एका ट्रकमधून दोन तस्कर शुक्रवारी गांजा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती एएनसीच्या घाटकोपर पथकाच्या प्रभारी निरीक्षक लता सुतार यांना मिळाली हाेती. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक विशाल खैरे व पथकाने पाळत ठेवून टाटा ट्रक (एमएच ४८ एवाय ०८९३) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गोण्यांत एकूण १८०० किलो गांजा आढळून आला. दोघांना अटक करून चौकशी केली असता ओडिशातून गांजा आयात करीत असल्याची कबुली त्याने दिली.
* शहाळ्याच्या आडून गांजाचा धंदा
शहाळे आणायचे आण्त, असे सांगून आराेपी भाड्याने ट्रक घेऊन जात असत. ठरावीक ठिकाणी ड्रायव्हरला एका हॉटेलात थांबायला लावून ट्रक घेऊन गांजाच्या शेताची लागवड असलेल्या ठिकाणी नेऊन गांजा भरून घेत. त्यावर शहाळे टाकून परत हैदराबादमार्गे येऊन सोलापूर, पुणे येथे काही गांजा उतरविला जात असे. त्यानंतर सातपुते याच्या मालकीच्या भिवंडीतील गोदामात ट्रक उतरविला जाई, तेथून गांजा विविध ठिकाणी पाठविला जात असे. याप्रकरणी तस्कर आकाश यादव याच्या विरुद्ध सुरत पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
* गांजा विक्रीचा पैसा हवालामार्फत
गांजा विक्रीतून महिन्याला सरासरी सात कोटी रुपये जमा होत होते, ते कधी रोखीने तर कधी हवालामार्फत संबंधितांपर्यंत पोहोचविले जात होते.
* ४ महिन्यांत १५.१५ कोटींचा माल जप्त
मुंबई पोलिसांच्या एएनसीने गेल्या ४ महिन्यांत एनडीपीडीएस कायद्याअंतर्गत एकूण ३२ गुन्हे दाखल केले असून १५ कोटी १५ लाख ३० हजार किमतीचा माल जप्त केला आहे. त्यामध्ये एकूण ६५ आरोपींना अटक केली आहे.
...................