नववर्षात १८०० दशलक्ष लीटर जादा पाणी; कामांसाठी होणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:33 AM2019-01-01T05:33:26+5:302019-01-01T05:33:46+5:30

पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना नवीन वर्षात अखेर दिलासा मिळणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प पुढच्या वर्षी प्रत्यक्षात सुरू होत आहे.

1800 million liters of fresh water in the new year; Uses will be used for work | नववर्षात १८०० दशलक्ष लीटर जादा पाणी; कामांसाठी होणार वापर

नववर्षात १८०० दशलक्ष लीटर जादा पाणी; कामांसाठी होणार वापर

Next

- शेफाली परब-पंडित

मुंबई : पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना नवीन वर्षात अखेर दिलासा मिळणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प पुढच्या वर्षी प्रत्यक्षात सुरू होत आहे. यामुळे प्रक्रिया केलेले १८८० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मुंबईला मिळणार आहे. आगीच्या दुर्घटनेवेळी तसेच बागकाम, शौचालय, औद्योगिक आणि व्यावसायिक कामांमध्ये या पाण्याचा वापर होऊ शकेल. परिणामी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल.
तलावांमध्ये आवश्यकतेपेक्षा कमी जलसाठा असल्याने १५ नोव्हेंबर २०१८ पासून दहा टक्के पाणीकपात लागू झाली आहे. यामुळे मुंबईत पाणीबाणी निर्माण झाली आहे. मुंबईत दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तर लाखो लीटर पिण्याचे पाणी सांडपाण्यामार्गे वाहून जाते. या पाण्यावर प्रक्रिया केल्यास त्याचा वापर घरकाम, बागकाम, गाडी धुणे अशा कामांसाठी करता येईल. या उद्देशाने मुंबईत सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार होते. मात्र प्रत्यक्षात केवळ कुलाबा येथेच हे केंद्र सुरू झाले. उर्वरित केंद्रांचे काम बराच काळ रखडले. अखेर या कामासाठी निविदा काढण्यात आल्या असून २०१९ मध्ये कामाला सुरुवात होईल. त्यानंतर एप्रिल २०१९ पासून प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध होईल.
सध्या दररोज एक हजार दशलक्ष लीटर सांडपाणी समुद्रात सोडण्यात येते. या पाण्यावर एकदा प्रक्रिया करून हे पाणी सोडून देण्यात येते. मात्र यापुढे सांडपाण्यावर दोन ते तीन वेळा प्रक्रिया करून ते पाणी इतर कामांसाठी वापरण्यायोग्य करण्यात येणार आहे. या पाण्याचा वापर अग्निशमन दलास आग विझवण्यासाठी करता येईल, तसेच बागकाम, शौचालय, औद्योगिक आणि व्यावसायिक कामांमध्ये होऊ शकेल.

यासाठी वापरणार पुनर्प्रक्रिया केलेले पाणी
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे, नौसेना, बीपीसीएल, एचपीसीएल, विमानतळ प्राधिकरण, गोदी आदी आस्थापना त्यांच्या विविध कामांसाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात पाणी खरेदी करीत असतात. या आस्थापनांना पुरविले जाणारे पाणी हे पिण्याचे पाणी असते. याच पाण्याचा रेल्वेचे डबे धुण्यासारख्या पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठीही वापर होतो. मात्र, यापुढे मलजल प्रक्रिया केंद्रांमधून उपलब्ध होणाºया पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा अशा कामांसाठी महापालिका करणार आहे.

प्रकल्पासाठी एक हजार कोटींचा खर्च
मुंबईत सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार होती. यापैकी कुलाबा येथे दररोज ३७ दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया होत आहे. भांडुप (२१५ दशलक्ष लीटर), घाटकोपर (३३७ दशलक्ष लीटर), वरळी (५०० दशलक्ष लीटर), वांद्रे (३६० दशलक्ष लीटर), धारावी (२५० दशलक्ष लीटर), वर्सोवा (१८० दशलक्ष लीटर) या ठिकाणी २०१९ मध्ये केंद्रे सुरू होत आहेत. या प्रकल्पावर तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

Web Title: 1800 million liters of fresh water in the new year; Uses will be used for work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई