मुंबई विमानतळ; कोरोना काळात बजावली महत्त्वाची भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात आंतरराष्ट्रीय प्रवासबंदीमुळे एकीकडे विमान प्रचलनावर परिणाम झाला असताना, गेल्या वर्षभरात वैद्यकीय सामग्रीच्या वहनासाठी मुंबई विमानतळावरून तब्बल १८०० विमानांनी ये-जा केल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशभरात आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे बहुतांश वैद्यकीय साहित्याची आयात करावी लागली. वाढत्या रुग्णसंख्येला थोपविण्यासाठी या सर्व साहित्याची जलद वाहतूक होणे गरजेचे होते. अशा वेळी हवाई वाहतूक क्षेत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत वैद्यकीय मालवाहतुकीत आघाडी घेतली. मुंबई विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात येथून जवळपास १८०० कार्गो विमानांनी वैद्यकीय सामग्रीची ने-आण केली. यात कोरोना संदर्भातील औषधे आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची वाहतूक करणाऱ्या १ हजार ४७३ तर, लसींची वाहतूक करणाऱ्या ३९६हून अधिक विमानांचा समावेश आहे.
दुसऱ्या लाटेत (२६ एप्रिल ते १४ मे) मुंबई विमानतळावर विविध देशांतून १७ हजार ७०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ३ लाख १९ हजार ८०० रेमडेसिविर इंजेक्शन, १ लाख १३ हजार ९०० टोसिलीझूमॅब इंजेक्शन दाखल झाले. ही ३८७ टन वैद्यकीय मदत तत्काळ हाताळण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली.
म्हणून कार्गो विमानांच्या फेऱ्या वाढल्या
क्रिसिल या संस्थेच्या अहवालानुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात हवाई प्रवाशांची संख्या केवळ ३४ टक्के, तर मालवाहतुकीचे प्रमाण ७४ टक्के नोंदविण्यात आले. कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले असताना केवळ वैद्यकीय मालवाहतुकीमुळे हवाई वाहतूक क्षेत्राला दिलासा मिळाला. शिवाय इ-कॉमर्स क्षेत्राच्या वाढत्या प्राबल्यामुळे कार्गो विमानांचे प्रचलन वाढल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.