म्हाडाच्या १८ हजार फायली आगीच्या भक्ष्यस्थानी, धक्कादायक माहिती समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 05:11 AM2018-04-06T05:11:40+5:302018-04-06T05:11:40+5:30
म्हाडाच्या तब्बल १८ हजार फायली भक्ष्यस्थानी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हाडातील गृहनिर्माण प्रकल्पांची महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या फायली जळून खाक झाल्या असून, या फायलींमधील महत्त्वाची माहितीही यामुळे नष्ट झाल्याचे समोर आले आहे.
- अजय परचुरे
मुंबई - म्हाडाच्या तब्बल १८ हजार फायली भक्ष्यस्थानी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हाडातील गृहनिर्माण प्रकल्पांची महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या फायली जळून खाक झाल्या असून, या फायलींमधील महत्त्वाची माहितीही यामुळे नष्ट झाल्याचे समोर आले आहे.
फायलींना आगी लागणे, उंदरांनी फायली कुरतडणे यापासून बचाव करण्यासाठी म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) १८ हजार महत्त्वाच्या फायली नवी मुंबईतील महापेमध्ये असणाऱ्या शील कंपनीमध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या. यासाठी शील कंपनीसोबत करारही करण्यात आला होता. शील कंपनीतील ४ नंबरच्या डिपार्टमेंटमध्ये या सर्व फायली सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र डिसेंबर २०१७ मध्ये या इमारतीला भीषण आग लागली होती; आणि या आगीत या सर्व फायली जळून यातील कागदपत्रांचे नुकसान झाले आहे. शील कंपनीने या प्रकरणाची कोणतीही माहिती म्हाडाला कळवली नाही आणि आग लागली असली तरी या सर्व फायली सुरक्षित असल्याचा बनाव म्हाडाच्या अधिकाºयांसोबत केला. काही दिवसांपूर्वी यातील काही फायली म्हाडाने परत मागितल्यावर शील कंपनीने त्या देण्यावरून आधी टाळाटाळ केली; नंतर ज्या फायली म्हाडाच्या अधिकाºयांना मिळाल्या त्यात काही फायली जळालेल्या अवस्थेत होत्या तर काही फायलींमधील कागदपत्रे भिजलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे या फायलींमधली महत्त्वपूर्ण माहिती जवळपास नाहिशी झाल्याची भीती निर्माण झाली आहे.
म्हाडाच्या ज्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये घोटाळे आणि गैरप्रकार घडले आहेत; ज्याची चौकशी लाचलुचपत खात्याकडून सुरू आहे त्यासंदर्भातील फायलीही आगीच्या फेºयात आल्या असून, ही माहितीही आता नष्ट झाली आहे. या हलगर्जीपणाबद्दल शील कंपनीच्या विरोेधात कारवाई करावी, अशी विनंती म्हाडाने पत्राद्वारे नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनला केली आहे. म्हाडाकडून आम्हाला रीतसर पत्र मिळाले असून, त्यात त्यांनी शील कंपनीने फायलींसंदर्भात केलेल्या हलगर्जीबाबत त्यांच्याविरोधात रीतसर चौकशी व्हावी, अशी मागणी आमच्याकडे केल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी ‘लोेकमत’ला दिली.
सर्व महत्वाचा डेटा पाण्यात जाणार!
गेल्या वर्षी ११ डिसेंबरला शील कंपनीच्या ४ क्रमांकाच्या डिपार्टमेंटला आग लागली होती. त्या आगीत या सर्व फायली जळाल्या होत्या. शील कंपनीच्या उडवाउडवीच्या उत्तरांनंतर म्हाडाच्या अधिकाºयांनी स्वत: चौकशी केली असता त्यांना ही धक्कादायक माहिती मिळाली. शील कंपनीने या सर्व फायलींचे स्कॅनिंग केल्याचा दावा केला असला तरी त्याच्या झेरॉक्स प्रती म्हाडाच्या हाती लागलेल्या नाहीत. प्रती मिळाल्या नाही तर १८ हजार फायलींमधला सर्व महत्त्वाचा डेटा पाण्यात जाणार आहे. त्यामुळे सुरक्षित फायली ठेवायच्या कुठे, असा प्रश्न म्हाडाच्या अधिकाºयांसमोर आहे. फायलींमधील मजकूर आणि माहिती परत मिळवायची कशी, हा प्रश्नही म्हाडासमोर आहे.