भाजपा नेमणार १८ हजार शक्तिकेंद्र प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 06:23 AM2018-08-07T06:23:58+5:302018-08-07T06:24:08+5:30
भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात सध्या पाच मतदान बूथमागे एक शक्तिकेंद्र प्रमुख नेमण्याची व्यापक मोहीम हाती घेतली असून असे एकूण १८ हजार २०० प्रमुख नेमले जातील. चालू महिनाअखेर त्यांच्या प्रशिक्षणास सुरुवात होईल.
मुंबई : भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात सध्या पाच मतदान बूथमागे एक शक्तिकेंद्र प्रमुख नेमण्याची व्यापक मोहीम हाती घेतली असून असे एकूण १८ हजार २०० प्रमुख नेमले जातील. चालू महिनाअखेर त्यांच्या प्रशिक्षणास सुरुवात होईल.
१ कोटी ५ लाख सदस्य संख्या असलेल्या भाजपाने बूथनिहाय रचना केली आहे. एक बूथप्रमुख आणि त्याच्यासोबत २५ जण अशी प्रत्येक बूथची टीम असते. एकूण ९१ हजार ४५२ बूथ समित्या बनविण्यात येणार असून त्यापैकी ८५ हजार समित्यांची यादी तयार आहे. ४० हजार समित्यांची रचना पूर्ण झाली आहे.
प्रदेश भाजपाचे सरचिटणीस आणि विस्तारक योजनेचे संयोजक आ. रामदास आंबटकर यांनी सांगितले की, पाच बूथमागे एक शक्तिकेंद्र प्रमुख नेमण्यात येत आहे. त्यांना राज्य व केंद्राच्या लोकाभिमुख योजना, मोदी अॅपसह विविध लोकाभिमुख अॅपचा वापर, जनसंघ ते भाजपा असा पक्षाचा प्रवास आदी प्रशिक्षण दिले जाईल. दोन विधानसभा मतदारसंघांचे मिळून एक प्रशिक्षण शिबिर होईल.
>कुणाकडे आहे स्मार्ट फोन, दुचाकी
प्रत्येक मतदाराच्या सामाजिक, आर्थिक अवस्थेचा डेटा भाजपाकडून तयार केला जात आहे. कोणाकडे स्मार्ट फोन आहे, कोणाचे स्वत:चे घर नाही, कोणाकडे दुचाकी आहे, इथपासून प्रत्येक मतदाराचा बारीकसारीक तपशील तयार केला जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक प्रचाराचे मायक्रोप्लॅनिंग करण्यासाठी हा डेटा उपयुक्त ठरणार आहे.
>घोषणा अन् लगेच अंमलबजावणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणासंदर्भात भाजपाच्या आमदारांची बैठक घेतली. त्यात राज्य सरकारने मराठा समाजाच्या कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती आपापल्या मतदार संघात देण्यासाठी प्रत्येक भाजपा आमदाराने साहाय्यता केंद्र उभारावे, असे निर्देश देण्यात आले होते. हे केंद्र चालविणार असलेल्या प्रत्येक मतदार संघातील दोन कार्यकर्ते/आमदारांचे पीए यांचे प्रशिक्षण शिबिर शनिवारी मुंबईत घेण्यात आले.