मुंबई
मुंबईतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील ५ आगारात तब्बल १८७ बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले आहे. त्यामुळे या बसेस कोरोना फ्री झाल्या आहेत; मात्र असे असले तरी बसमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन करत बेफिकीरपणे प्रवास करत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव झाला आणि शहरी, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली बससेवा बंद करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली असली, तरी अनेक मार्गांवरील बसेस अद्यापही बंद आहेत. काही बसेस सुरू झाल्या आहेत. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध मार्गांवर असलेल्या विभागातील १८७ बसेसचे कोटिंग पूर्ण झाले आहे.
एका बसचे ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्यासाठी जवळपास सात हजार रुपयांचा खर्च आला आहे. सद्यस्थितीत वर्षातून दोन वेळा बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या सूचनेनुसार, पुढील कोटिंगबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे मात्र प्रवाशांना कोरोनापासून दूर ठेवण्यास मदत होणार आहे.
बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूलाच बसला असल्यास
एखाद्या बाधित व्यक्तीने बसप्रवास केला तरी इतर प्रवाशांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ॲन्टिमायक्रोबियल कोटिंगमुळे कमी होते. बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले असले, तरी बसद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.
---
प्रवासी काय म्हणतात...
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेक जण बसने प्रवास करण्यास नकार देत होते; परंतु आता महामंडळाने बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित झाला आहे.
- सुनील काकडे , प्रवासी.
आम्ही बसद्वारे नियमित प्रवास करतो; परंतु कोरोनामुळे बस बंद झाल्या होत्या. त्यावेळी अनेक अडचणी आल्या. आता बसेस पूर्ववत होत आहेत. त्यात बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले जात असल्याने प्रवास सुरक्षित होणार आहे.
- रोहन पारडे, प्रवासी.
प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून महामंडळ बसेसला कोटिंग करीत आहेत. जवळपास १८७ बसेसला कोटिंग केले आहे. अजून काही बसेस कोटिंग करायच्या बाकी आहेत. कोटिंग केले तरी प्रवाशांनी प्रवास करतेवेळेस सामाजिक अंतर ठेवत मास्कचा पुरेपूर वापर करावा.
वरिष्ठ अधिकारी ,एसटी महामंडळ
आगार - कोटिंग केलेल्या बस
मुंबई सेंट्रल -५७
परळ -७१
कुर्ला -३१
पनवेल -१५
उरण -१३