मुंबई पोलीस दलातील १८७१ जणांना कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 02:45 AM2020-06-10T02:45:02+5:302020-06-10T02:45:28+5:30
२१ पोलिसांचा मृत्यू : ८५३ पोलिसांची कोरोनावर मात
मुंबई : कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतपोलिसांभोवती कोरोना सर्वाधिक धोका असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहेत. मुंबई पोलीस दलातील १८७१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी २१ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे तर, ८५३ पोलिसांची कोरोनावर मात केली आहे.
राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २५६२ असून, पोलिसांचा मृत्यूचा आकडा ३४ वर पोहचला आहे. तर सध्या १४३१ कोरोनाबाधित पोलीस उपचार घेत आहेत. कोरोनाबाधित पोलिसांचे प्रमाण घटत असले, तर संकट कायम आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या १८७१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात २५९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोमवार पर्यंत यापैकी ८५३ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून, २१९ पोलीस कर्तव्यावर हजर झाले आहेत. यात आयपीएस अधिकारीचाही समावेश आहे. मुंबईत ५७१ कोविड सेंटर असून त्यापैकी २३१ रुग्णालयात कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरु आहेत. वाढत्या आकड्यांमुळे प्रत्येक पोलिसाची कोरोना चाचणीची मागणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मरोळ आणि वरळीत पोलिसांसाठी विशेष नियोजन
पोलिसांना उपचारासाठी वणवण करण्याची वेळ येत असल्याच्या तक्राररनंतर मरोळ पोलीस मुख्यालय आणि वरळी परिसरात कोरोनाबाधित पोलिसांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
३१ जणांचे घरीच विलगीकरण
३१ पोलिसांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे दिसत असल्याने त्यांना घरीच क्वॉरंटाइन करण्यात आले आहेत. तर १६४ पोलिसांना डिस्चार्ज नंतर विश्रांतीसाठी घरीच थांबण्याचा सल्ला दिल्याने ते घरी आराम करत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
एसआरपीएफच्या ८२ जवानांना बाधा : पोलिसांसह मुंबईत कार्यरत एसआरपीएफच्या ५ अधिकाऱ्यांसह ७७ कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावरही विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.