Join us

‘८ प्रहर’मध्ये १९ तास, १९ संगीतकार

By admin | Published: February 17, 2016 2:29 AM

भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच १९ आघाडीचे संगीतकार १९ तास वैविध्यपूर्ण आणि यथोचित असे राग ‘८ प्रहर’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात सादर करणार

मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच १९ आघाडीचे संगीतकार १९ तास वैविध्यपूर्ण आणि यथोचित असे राग ‘८ प्रहर’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात सादर करणार आहेत. ही कॉन्सर्ट रविवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणार असून, २२ फेब्रुवारीला मध्यरात्री १.३०पर्यंत रंगणार आहे. हा उत्सव सायन येथील षण्मुखानंद फाईन आर्ट्स अ‍ॅण्ड संगीत सभा येथे होणार आहे.आर्ट अ‍ॅण्ड आर्टिस्ट्सच्या संस्थापिका आणि संचालिका दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारत असून, ‘८ प्रहर कॉन्सर्ट’मध्ये प्रत्येक प्रहराचे संगीत सादर होणार आहे. श्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स अ‍ॅण्ड संगीत सभा, पंचम निषाद आणि आर्ट अ‍ॅण्ड आर्टिस्ट्स या संस्थांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. किशोरी आमोणकर, हरिप्रसाद चौरसिया, एन. राजम, उल्हास कशाळकर, राशीद खान आणि राजन साजन मिश्रा यांसारखे ज्येष्ठ आणि प्रख्यात कलाकार या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दुर्मीळ रागांबरोबरच या बासरी, व्हायोलीन, संतूर, सारंगी, सितार, सरोद आणि महावीणा ऐकायला मिळेल. प्रख्यात बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया हे सकाळी ६ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात करतील. ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर या कार्यक्रमाची सांगता करणार आहेत. त्या म्हणाल्या की, ‘८ प्रहर ही आयोजकांतर्फे एक आदर्शवत संकल्पना आहे. निसर्ग आणि ऋतूमध्ये होणाऱ्या बदलांप्रमाणेच सांगीतिक ध्वनीतही बदल होतात. त्याचप्रमाणे त्यांच्या आंतर-संबंधांमध्येही बदल होतात.’श्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स अ‍ॅण्ड संगीत सभाचे उपाध्यक्ष व्ही. एस. अमरनाथ सुरी म्हणाले, ‘आमची संस्था ६३ वर्षे कार्यरत आहे. ८ प्रहर कार्यक्रमाबरोबर जोडले जाताना आम्हाला आनंद होत आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या रसिक आणि संगीतप्रेमींमध्ये जागृती घडवून आणणे हा आमचा उद्देष आहे.’‘८ प्रहर’ हा संगीताच्या अशा पर्वाला उजाळा देण्याचा एक प्रयत्न असेल की ज्या वेळी संगीत तासन्तास सादर केले जात असे. दुर्गा जसराज यांच्या मते, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला अत्यंत उंची आणि वैविध्यपूर्ण वारसा लाभला आहे. ‘मी लहानपणी अशा कार्यक्रमांना हजेरी लावत असे. ते कार्यक्रम पहाटेपर्यंत चालत. पण आता, सर्वच कार्यक्रम हे सायंकाळी होतात आणि त्यामुळे हिंदुस्तानी शास्त्रीय रागांची उंची परंपरा लुप्त होईल की काय अशी भीती वाटते. पुढील पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवण्यासाठीच हा कार्यक्रम साकार झाला आहे.’ (प्रतिनिधी)