Join us

म्हाडाच्या घरासाठी १९ लाखांनी फसवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 11:02 AM

भामट्यावर बीकेसी पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान म्हाडाची खोली घेऊ न शकलेल्या लोकांचे घर मिळवून देतो असे सांगत एका खासगी कंपनीत हाउसकीपिंग सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला १८.७६ लाखांचा चुना लावण्यात आला. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी देवदास पांडुरंग शिंदे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार राहुल बिऱ्हाडे (३३) हे अंधेरीत एका खासगी हाउसकीपिंग कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात. त्यांची २०१६ मध्ये एका डॉक्टरच्या गाडीवर चालक म्हणून कामाला असलेल्या शिंदेसोबत ओळख झाली. शिंदेने बिऱ्हाडे यांना त्याचे मित्र म्हाडामध्ये आहेत आणि मुलुंड टोल नाका याठिकाणी रूम मिळत आहे असे सांगितले. बिऱ्हाडे यांनादेखील घराची गरज असल्याने शिंदेच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी त्याला ३ जून २०२१ रोजी ६० हजार रुपये दिले. मात्र रूमची चावी मिळण्याची तारीख उलटून गेल्यानंतर देखील घर न मिळाल्याने तक्रारदाराने शिंदेकडे विचारणा केली. त्यावर साहेब लोकांना काहीतरी द्यावं लागेल मगच चावी मिळेल असे तो म्हणाला. 

फोन घेणे बंद केलेकाही रक्कम बिऱ्हाडे यांनी जीपे द्वारे ट्रान्सफर केली. मात्र तेव्हाही साहेब सुट्टीवर गेलेत, आजारी आहेत अशी कारणे देत तो वेळ मारून नेऊ लागला. घर मिळावे यासाठी शिंदेने सांगितल्याप्रमाणे दारूच्या बाटल्या, त्याच्या फोनचे रिचार्ज देखील बिऱ्हाडे यांनी केले. मात्र सर्व पैसे घेतल्यावर शिंदेने त्यांचा फोन घेणे बंद केले. तसेच घेतलेल्या पैशाची कोणतीही पावती त्याने दिली नाही. तेव्हा फसवणूक झाल्याचे बिऱ्हाडेच्या लक्षात आले. 

म्हाडा अधिकाऱ्याचीही तोतयागिरी !बिऱ्हाडे यांच्या म्हणण्यानुसार शिंदे हा नेहमी  म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत मेलविन डीसोजा नावाच्या व्यक्तीसोबत बोलायचा. तसेच हा कथित म्हाडा अधिकारी तक्रारदाराशी बोलून दरवेळी वेगवेगळी रक्कम शिंदेला द्यायला सांगायचा. त्यामुळे तो कोण आहे याबाबतही पोलिस तपास करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई