सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबईकल्याण येथे राहणारी एक महिला मुंबई पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पतीच्या अंतिम दर्शनाला मुकली. ज्या पोलीस ठाण्यात तिचा पती हरवल्याची तक्रार होती, त्याच पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूचीही नोंद होती. मात्र दोन वर्षांत ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आलीच नव्हती. बेपत्ता व्यक्तींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन नवी मुंबईत भरले होते. त्यात तिला या प्रकाराचा उलगडा झाला. या प्रदर्शनाने तब्बल १९ व्यक्तींना आपल्या हरवलेल्या सहृदांची माहिती मिळवून दिली.कल्याण शिवशांतीनगर येथे राहणारे रमेश जाधव (४०) हे दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. मुंबईच्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्याची तक्रार दाखल होती. गेली दोन वर्षे त्यांचे कुटुंबीय त्यांची वाट पाहत होते. पण ज्या दिवशी तक्रार नोंदवण्यात आली, त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. बेवारस म्हणूनच रमेश जाधव यांचा अंत्यविधीही झाला. नवी मुंबई गुन्हे शाखेने भरवलेल्या बेपत्तांच्या छायाचित्र प्रदर्शनात याचा उलगडा झाला. दोन वर्षांनंतर हे वास्तव कळताच त्यांच्या पत्नी भोवळ येऊन कोसळल्या.या प्रदर्शनात सुमारे १५ हजार छायाचित्रे ठेवण्यात आली होती. बेपत्ता झालेल्या नातेवाइकांच्या शोधात असलेल्या शेकडो लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यामध्ये १९ बेपत्ता व्यक्तींचा शोध लागल्याचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. १० व्यक्ती नवी मुंबई आयुक्तालयातील तर ९ व्यक्ती मुंबई व सोलापूर परिसरातील आहेत. ९ बेवारस मृतदेहांचीही ओळख पटलेली असून दादर, बोरीवली, वाशी व वडाळा या रेल्वे पोलीस ठाणे व ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे मृतदेह आहेत. त्यानुसार प्रदर्शनातून २८ प्रकरणांचा उलगडा झाल्याचे समाधान पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनीही व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
छायाचित्र प्रदर्शनामुळे सापडल्या १९ बेपत्ता व्यक्ती
By admin | Published: April 30, 2015 11:34 PM