दंगलीतील फरार आरोपीला १९ वर्षांनंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:44 AM2018-12-08T05:44:46+5:302018-12-08T05:44:53+5:30
मुंबईत १९९२-९३ साली झालेल्या दंगलीत हत्येचा आरोप असलेल्या फरार आरोपीला बुधवारी १९ वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली.
मुंबई : मुंबईत १९९२-९३ साली झालेल्या दंगलीत हत्येचा आरोप असलेल्या फरार आरोपीला बुधवारी १९ वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली. त्याला वांद्रे परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
ऑगस्टीन मायकेल अँथॉनी जोसेफ (५१) असे त्याचे नाव आहे. मुंबईत दंगलीदरम्यान आरएके परिसरात समूहाने एका व्यक्तीची हत्या केली होती. त्यात जोसेफचा सहभाग असल्याने त्याला आरएके मार्ग पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. खटला सुरू असल्याने काही वर्षे तो न्यायालयात हजर राहिला. नंतर पसार झाला. जवळपास १९ वर्षे तो पोलिसांना चकवा देत होता. फरार आरोपींची यादी वरिष्ठांनी गुन्हे शाखेला दिली होती. दरम्यान, दंगलीत सहभागी एक व्यक्ती वांद्रेत येणार असल्याची माहिती कक्ष ९ चे प्रमुख महेश देसाई यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वांद्रे पश्चिमेत सापळा लावून जोसेफला अटक केली.