लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या प्रत्येकी ५ अशा एकूण १० स्थानकांवर वाऱ्याची गती व दिशा यांची नोंद करणारे ॲनिमोमीटर यंत्र सुरू करण्यात आले आहे. यंत्राच्या मदतीने वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेतला जाईल. त्यामुळे मेट्रोला वाऱ्याच्या स्थितीचे बारकाईने निरीक्षण करून मेट्रोची सेवा विनाव्यत्यय कार्यान्वित ठेवणे सुरक्षित आहे की नाही हे ठरविता येईल. प्रत्येक मेट्रो स्थानकावर किमान ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, एकूण कॅमेऱ्यांची संख्या १९०० आहे. ज्यात प्लॅटफॉर्म, रस्त्याजवळ असलेला भाग याचा समावेश आहे. या कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग २४ तास नियंत्रण केंद्र आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे केले जाणार आहे.
हॉटलाइन
आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन, मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्र, पोलिस नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका सेवा आणि अग्निशमन दलासोबत मेट्रोच्या कंट्रोल रूमचा हॉटलाइन क्रमांक थेट जोडलेला आहे. त्यामुळे समन्वय करणे सोपे होईल.
चारकोप मेट्रो डेपोमध्ये २४ तास कार्यरत असणारे मान्सून कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना तत्काळ मदत मिळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे या कंट्रोल रूममध्ये प्रशिक्षित कर्मचारी २४ तास असतील. हवामानामुळे उद्भवणारी अनपेक्षित परिस्थिती, प्रवासादरम्यानचा व्यत्यय सोडवण्यास ते मदत करतील.
महामुंबई मेट्रो नागरिकांना विनाव्यत्यय तसेच सुरक्षित प्रवास सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध. मान्सून कंट्रोल रूम ही आधुनिक तंत्रज्ञानाने प्रशिक्षित कर्मचारी यांनी सज्ज. वातावरणीय बदल आणि मेट्रोची सेवा यांचे निरीक्षण करून नागरिकांचा प्रवास सुरक्षितता केला जाईल.
आपत्कालीन परिस्थितीत गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यास विलंब होणार नाही, याची खबरदारी म्हणून इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये व्यत्यय आल्यास महामुंबई मेट्रोकडून गरजेनुसार अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्याची तयारी करण्यात आली आहे.- डॉ. संजय मुखर्जी, अध्यक्ष, महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ