मुंबई - ऐन सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमधील भेसळ वाढत असल्याने आता अन्न व औषध प्रशासन विभाग अॅक्शन मोडवर आले आहे. हाॅटेल, मिठाईच्या दुकानांसह आता एफडीएने थेट गुरुवारी रात्री ते शुक्रवार पहाटेपर्यंत मुंबई शहर उपनगरातील दहिसर, मानखुर्द - वाशी , ऐरोली, मुलुंड चेकनाका पुर्व, मुलुंड चेकनाका एल. बी. एस. या पाचही ठिकाणी परराज्य व परजिल्हयातून येणाऱ्या वाहनातील प्रत्येक दूधाची तपासणी टोल नाक्यावरच तपासणी करण्यात आली. यात सुमारे ७ लाख २६ हजार ४३ लीटर साठ्याची तपासणी करुन एकूण १९०० लीटरचा साठा परत पाठविण्यात आला, तर २३ लीटरचा साठा टोलनाक्यांवरच नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
या मोहिमेअंतर्गत एकूण २०४ दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून ३४६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील विश्लेषण केलेल्या अन्न नमुन्यामधील तीन अन्न नमुने कमी दर्जाचे असल्याचे निर्दशनास आले व एक अन्न नमुना मिथ्याछाप असल्याचे निर्देशनास आले. पुढील काळातही निर्भेळ रोखण्यासाठी प्रशासनातर्फे नियमितपणे अशा कारवाया करण्यात येतील अशी माहिती सह आयुक्त अन्न शैलेश आढाव यांनी दिली आहे.
या मोहिमेमध्ये अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी यांचा सहभाग होता. तसेच, सहअन्न व औषध प्रशासन ठाणे कार्यालयातील सहाय्यक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी देखील मदत केली. त्याचप्रमाणे, अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे यांनीही वाशी टोल नाक्याला भेट देत पर्यवेक्षण केले.