मुंबई, ठाणे वगळता राज्यातील १९ हजार शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:15 AM2021-01-08T04:15:54+5:302021-01-08T04:15:54+5:30
मुंबई : मुंबई, ठाणे वगळता राज्याच्या सर्व जिल्ह्यांत नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. ४ जानेवारीच्या माहितीप्रमाणे राज्यात ...
मुंबई : मुंबई, ठाणे वगळता राज्याच्या सर्व जिल्ह्यांत नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. ४ जानेवारीच्या माहितीप्रमाणे राज्यात १९,५२४ शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून १ लाख ५७ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. राज्यातील शाळा सुरू होण्याचे प्रमाण ८७ टक्के असले तरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण अवघे २७ टक्केच आहे.
राज्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करून टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्या वेळी नववी ते बारावीच्या सुरू झालेल्या शाळांची संख्या केवळ ९,१२७ इतकी होती. आज त्यात वाढ होऊन ती १९,५२४ झाली आहे. तसेच विद्यार्थी उपस्थितीमध्येही वाढ होऊन ती २ लाख ९९ हजार १९३ वरून १५ लाख ५७ हजार ८०७ एवढी झाली आहे. म्हणजेच १ महिना १२ दिवसांत विद्यार्थी उपस्थिती १३ लाखाने वाढली असल्याची माहिती एससीईआरटीने दिली.
मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता त्या सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन केव्हा घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषतः दहावी-बारावीचे अर्ज भरण्यास अडथळे येत असल्याने शाळा लवकर सुरू व्हाव्यात, अशी मागणी संस्थाचालक आणि पालकांमधून होत आहे.
चौकट
नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळांची आकडेवारी
राज्यातील एकूण संख्या - २२,२०४
विद्यार्थी संख्या - ५६,४८,०२८
सुरू झालेल्या शाळांची संख्या - १९,५२४
उपस्थित विद्यार्थी - १ लाख ५७ हजार ८०७
.....