लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सध्या तीन कोटी लस डोस साठविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्राला कोल्ड चेन पुरवठा आणि साठवण सुविधांविषयी स्थिती अहवाल दिला असून, त्यात ही माहिती दिली. याशिवाय राज्यात १.९१ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नाेंदणी सरकारी अॅपवर पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी करण्यात आली.
राज्यात एका केंद्रावर साधारण १०० जणांना एका वेळी लस देता येईल, अशी तयारी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली, तर मुंबईतील १.२५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या कालावधीत आठ केंद्रांवर कोविड लस दिली जाईल. शासनाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला लसीकरणासाठी दिनांक, वेळ, लसीकऱण केंद्राबाबतची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
केंद्राकडून कोल्ड साखळी सुविधांच्या मूल्यांकनासंदर्भात राज्य सुविधांच्या बाबतीत अग्रेसर आहे. इतर राज्यांपेक्षा चांगल्या सुविधा राज्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात लसींच्या वाहतुकीसाठी अधिक रेफ्रिजरेटर आणि इन्सुलेटर व्हॅन मिळणार आहेत.
* केंद्राच्या याेजनेनुसार असा असेल क्रम
केंद्राच्या योजनेनुसार वैद्यकीय कर्मचारी प्रथम लसीकरण करतील. त्यानंतर, आरोग्य कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस, वाहतूक कर्मचारी अशा क्रमाने ही लस दिली जाईल, असे राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितले.