मुंबई :कोरोना रुग्णांसाठी असलेल्या निरनिराळ्या सेवासुविधांची माहिती देणे, त्यांच्या तक्रारी सोडविणे यासाठी मुंबई महापालिकेने १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर विशेष सेवा २४ एप्रिलपासून कार्यान्वित केली असून, आजवर या मदत सेवेवर ६९ हजार ४०७ कॉल प्राप्त झाले आहेत.
मुंबई महापालिकेने या सेवेसाठी ३ सत्रांमध्ये एकूण ४८ कर्मचारी व ३ ते ४ वैद्यकीय अधिकारी नेमले आहेत. घरी अलगीकरण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमुळे प्रत्येक सत्रात सध्या ६ कर्मचारी कार्यरत आहेत. या सेवेवर दररोज सुमारे ४ हजार दूरध्वनी संभाषण कार्यक्षमतेने हाताळले जात आहेत. दरम्यान, खाटांच्या उपलब्धतेसाठी सद्यस्थितीची माहिती देणारा संक्षिप्त फलकही विकसित करून कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांची ने-आण करण्यास मदत होते आहे.