तीव्र संक्रमण काळातील आकडेवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या काळात राज्य शासनाच्या जे. जे. रुग्णालयाचे योगदानही तितकेच आहे. या रुग्णालयाला संपूर्णतः कोविड रुग्णालय घोषित करण्यात आले नव्हते, तरीही उपचारांची आवश्यकता असणाऱ्या कोरोनाग्रस्त गर्भवतींना दाखल करून त्यांच्या यशस्वी प्रसूती करण्यात आल्या. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात या रुग्णालयात १९२ कोरोनाग्रस्त गर्भवतींच्या प्रसूती कऱण्यात आल्या.
जे. जे. रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून १९२ पॉझिटिव्ह गर्भवती महिलांची प्रसूती केली आहे. लॉकडाऊनच्या वेळी, अनेक रुग्णालये संसर्गाच्या भीतीने प्रसूती करत नव्हते आणि तपासणी केल्याशिवाय कोणताही धोका पत्करणे कठीण होते. बऱ्याच गर्भवती महिलांच्या प्रसूतीतील गुंतागुंत लक्षात घेत त्यांना शेवटच्या क्षणी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले हाेेते. त्यांचा कोरोना रिपोर्ट येईपर्यंत त्यांची प्रसूती झालेली असायची.
गर्भवती महिलांसाठी ट्रान्झिट वॉर्ड तयार केला होता. सर्व महिलांची चाचणी घेतली जात होती. मात्र आम्हाला अहवाल प्राप्त होईपर्यंत एकतर नैसर्गिक प्रसूती किंवा सिझेरियन व्हायची. रुग्ण प्रसूतीच्या अंतिम टप्प्यात रुग्णालयात यायचे, आम्हाला अहवालाची वाट पाहायला वेळ मिळत नव्हता. काळजी आणि जोखीम घेऊन आई आणि बाळाचे आयुष्य वाचवायचो, असे डाॅ. कटके यांनी सांगितले.
* सरकारी रुग्णालये सर्व आपत्ती हाताळण्यास सक्षम
कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात खासगी रुग्णालय रुग्णांवर उपचार करण्यास घाबरत असत तेव्हा फक्त सरकारी रुग्णालयांनी कोविड आणि कोविड नसलेल्या रुग्णांवर उपचार केले. यावरुन हे सिद्ध झाले की सरकारी रुग्णालये आणि डॉक्टर सर्व आपत्ती हाताळण्यास सक्षम आहेत, असे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
----------------------