मुंबई/ठाणे : लोकसभेच्या मुंबई, ठाणे जिल्हा आणि पालघर येथील दहा मतदारसंघांतून १९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईतून नऊ, ठाणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांतून नऊ आणि पालघरमधूनही नऊ उमेदवारांनी माघार घेतली.
मुंबईतील सहा मतदारसंघांतून ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता दक्षिण मुंबईत १३ तर दक्षिण मध्यमध्ये १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर उपनगरातील चार मतदारसंघांतून पाच उमेदवारांनी माघार घेतली आहे. या चार मतदारसंघांत एकूण ८६ उमेदवार रिंगणात आहेत. यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील १८, उत्तर पश्चिम मुंबईत २१, उत्तर पूर्व मुंबईत २७ तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील २० उमेदवारांचा समावेश आहे. मुंबईतील सहा जागांसाठी ९ एप्रिलपर्यंत १५६ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २७ अर्ज १० एप्रिल रोजी छाननी प्रक्रियेत बाद झाले. दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील १४ अर्ज छाननीत बाद झाले तर ३४ वैध ठरले. तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतील ११० पैकी १३ अर्ज अवैध ठरले होते. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून २५, उत्तर पश्चिम मुंबई २२, उत्तर पूर्व मुंबई २८ आणि उत्तर मध्यमधून २२ असे ९७ अर्ज वैध ठरले होते.
ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांतून नऊ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी शुक्रवारी मागे घेतली आहे. यामुळे या तिन्ही मतदारसंघांत आता ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ठिकठिकाणच्या पक्षीय बंडखोर उमेदवारांनीदेखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता या तिन्ही मतदारसंघांमधील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमधील लढती दुरंगी होणार आहेत.