लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मढ येथील १९५ एकर जमीन देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येणार आहे. १९५ एकरमधील काही जमीन खासगी रुग्णालय, एका गायक- संगीतकाराच्या संगीत अकादमीला, आमदारांच्या गृहनिर्माण संस्थेला आणि धारावी पुनर्विकासातील घरांसाठी दिली जाणार आहे. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मढ येथे एक खासगी कंपनी धर्मादाय रुग्णालय उभारणार आहे, तर आमदारांच्या गृहनिर्माण संस्थेला यापूर्वी वर्सोवा येथे देण्यात आलेला भूखंड सागरी नियमन क्षेत्राच्या नियमावलीमुळे विकसित करता आला नव्हता. त्यामुळे त्यांना मढ येथे भूखंड दिला जाणार आहे. तसेच धारावी पुनर्विकासात मोफत घरांसाठी अपात्र ठरलेल्या रहिवाशांसाठी आणि परवडणाऱ्या भाड्याच्या घरांसाठीही मढ येथे काही एकर भूखंड दिला जाणार आहे.
धर्मादाय रुग्णालय आणि संगीत अकादमीच्या जागेचा प्रस्ताव उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात पाठवला असून धारावीसाठीच्या घरांच्या जमिनीचा प्रस्ताव मंत्रालयात तयार करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे मढला जागेची मागणी करणाऱ्या तटरक्षक दलाचा प्रस्ताव अनेकदा फेटाळला असताना आता तिथे खासगी कंपनी, गायक आणि आमदारांसाठी भूखंड दिला जात आहे. समुद्रालगत असलेला मढ हा परिसर पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे ठिकाण आहे. या भागात अनेक कोळीवाडे असून आजही इथले मच्छीमार मासेमारी करतात. या भागात अनेकांचे बंगले असून इथे मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरणही होते.