मुंबई : दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मुंबईत 195 गोविंदा जखमी झाले असून त्यापैकी 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी सकाळी मुंबई महापालिकेने दिली आहे. उपचारासाठी ज्या गोविंदाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये केईएम रुग्णालयात 12, प्रत्येकी 2 राजवाडी आणि वांद्रे भाभा रुग्णालयात, तर प्रत्येकी 1 डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यापैकी काहींवर आज शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 177 गोविंदाना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सध्या सर्व गोविंदाची प्रकृती स्थिर आहे.
महापालिकेने शुक्रवारी सकाळपर्यंत दिलेल्या माहितीनुसार, केईएम रुग्णालयात 59, सायन रुग्णलयात 12 , नायर रुग्णालयात 3, हिंदुजा रुग्णालयात 1, राजवाडी रुग्णालयात 16, शताब्दी रुग्णालयात 8, वीर सावरकर रुग्णालयात 1, एमटी रुग्णलयात 4, एमव्हीएन देसाई रुग्णालयात 16, कूपर रुग्णालयात 10, डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 11, वांद्रे भाभा रुग्णालयात 4, ट्रॉमा केअर रग्णालयात 20, पोद्दार रुग्णालयात 17, जीटी रुग्णालयात 4, सेंट जॉर्ज रुग्णालयात 4, जे जे रुग्णालयात 4, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 1 या गोविंदांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.
दरवर्षी कमी जास्त संख्येत गोविंदा जखमी होत असतात. काही गोविंदांना मुका मार लागतो तर काही गोविंदांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते. या वर्षी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे महापालिकेतील सर्व रुग्णलयातील १२५ पेक्षा अधिक रुग्णवाहिका आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले होत्या.याकरिता महापालिकेने ३ पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांची यांची नियुक्ती केली होती.