रणांगणात १९६ मुस्लीम उमेदवार
By admin | Published: February 6, 2017 03:34 AM2017-02-06T03:34:06+5:302017-02-06T03:35:42+5:30
देशाच्या आर्थिक राजधानीतील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी, तब्बल १९६ मुस्लीम उमेदवार विविध पक्षांमार्फत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत
जमीर काझी, मुंबई
देशाच्या आर्थिक राजधानीतील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी, तब्बल १९६ मुस्लीम उमेदवार विविध पक्षांमार्फत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात ९१ मुस्लीम महिलांचा समावेश आहे. अर्थात, ही प्रमुख राजकीय पक्षाकडून तिकीट मिळविलेल्यांची संख्या असून, त्याशिवाय अपक्ष उमेदवारांची संख्या दुप्पट असण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तवली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालावर राज्य सरकारचे भवितव्य आणि राज्यातील पुढील राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपाने सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा एक भाग म्हणून दोन्ही पक्षांतर्फे मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये प्रत्येकी ५ मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले आहे. एकूण १९६पैकी ९० टक्क्यांहून अधिक उमेदवार हे एकाच वॉर्डात असल्याने, समाजाच्या मतामध्ये मोठी विभागणी होणार आहे.
महापालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये एकूण २,७७४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. मंगळवारपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर, अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. २२७ प्रभागांपैकी जवळपास ५० प्रभागांमध्ये मुस्लीम समाजाची संख्या निर्णायक आहे. त्यामुळे उजवी व कट्टर विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांनी राजकारणाच्या अपरिहार्यतेपोटी मुस्लीम कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. मावळत्या सभागृहामध्ये २२ मुस्लीम नगरसेवक आहेत.
यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मुस्लीम उमेदवार समाजवादी पार्टीने दिलेले आहेत. हा पक्ष एकूण ८५ जागांवर लढत आहे. त्यापैकी ५८ उमेदवार मुस्लीम आहेत. त्यामध्ये महिला उमेदवारांची संख्या २३ आहे. त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेच्या रिंगणात प्रथमच उतरलेल्या ‘एमआयएम’चा नंबर आहे. दोन्ही काँग्रेस आणि समाजवादी पार्टीसाठी डोकेदुखी ठरणारा हा पक्ष एकूण ५९ जागांवर लढत आहे. त्यापैकी ५ उमेदवार दलित समाजातील असून, उर्वरित ५४ मुस्लीम आहेत. त्यामध्ये महिलांची संख्या २० आहे.
परंपरागत हक्काची ‘व्होट बॅँक’म्हणून मुस्लीम मते गृहित धरणाऱ्या कॉँग्रेसने, या वेळी २२७ पैकी २९ ठिकाणी मुस्लिमांना तिकीट दिलेले आहे, त्यापैकी १७ महिला आहेत. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्याहून अधिक म्हणजे ४१ जणांना तिकीट दिलेले असून, त्यात १९ महिला आहेत. शिवसेना व भाजपाने प्रत्येकी पाच मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे.
त्यात चार महिला उमेदवार आहेत, तर मनसेने चार मुस्लिमांना पक्षातर्फे तिकीट दिले असून, या सर्व महिला आहेत.